मुंबई : जळगाव जिल्ह्यातील दोन नेते एकमेकांवर हल्ले करण्याची संधी सोडत नसतात. भाजप नेते गिरीश महाजन आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएससोबत संबंध असल्याचा आरोप केला. या वादात भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली. त्यांनी खडसे यांचे मागील आरोपाचा संदर्भ देत एका प्रकारे आव्हानच दिले. आम्ही ईडी लावली, पण तुमची सीडी कुठे? असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केला.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, राजकारणामध्ये अधिका-यांशी संबंध होता. त्याचा अर्थ गैर घेऊ नका. ओळखी असणे याला संबंध म्हणतात का? त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका ते चांगल्या अर्थाने बोलले. भाजप सोडल्यापासून खडसे रोज रेकॉर्डिंगबाबत सांगत आहे. परंतु त्यांनी रेकॉर्डिंग एकदाही वाजून दाखवली नाही. ती रेकॉर्डिंग एकदा वाजवायला पाहिजे. यामुळे मन शांत होईल. तुम्ही ईडी लावली तर आम्ही सीडी लावू असे ते यापूर्वी वारंवार म्हणत होते. मग आम्ही ईडी लावली पण तुमची सीडी कुठे गेली? असा सवाल दानवे यांनी खडसेंना केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपणार
शिवसेना उबाठाबाबत बोलताना दानवे म्हणाले, काँग्रेस संपुष्टात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष संपलेला आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही असे विधान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इतकी ताकद होती. परंतु त्यांच्या वागण्यामुळे, व्यवहारामुळे आणि त्यांच्या विचारांपासून दूर गेल्यामुळे काँग्रेस जवळपास आता संपुष्टात आली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी संपलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही. एक काळ असा होता जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार आणि भाजपचा मी एकटा आमदार होतो.