26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रआम्हाला भाजपामुक्त राम हवा होता, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले

आम्हाला भाजपामुक्त राम हवा होता, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात अपेक्षित यश मिळाले नाही. यावरून विरोधकांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. एवढेच नव्हे तर राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होऊनही अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येते, तेथेही भाजपाचा उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकारण रंगल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी आमंत्रण असूनही राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणे टाळले. तर राम मंदिराच्या उभारणीवरून भाजपावर टीकास्त्र सोडले. यातच आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत राम मंदिर आणि भाजपा उमेदवाराचा झालेला पराभव यावरून निशाणा साधला. नाशिकमध्ये २२ जानेवारी रोजी सभा घेतली होती. त्या दिवशी काळाराम मंदिरात भगवान रामाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी म्हणालो होतो की, आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. मग हा भाजपमुक्त राम अयोध्यावासियांनी करुन दाखवला. त्या ठिकाणी भाजपला यश मिळाले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच नरेटिव्ह म्हणता, ते खोटे आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. त्यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचे चित्र अधिक चांगले राहील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होते की, संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिले होते. परंतु त्यांना ते समजले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेने धडा दिला. आता कसेबसे त्यांचे पंतप्रधानपद वाचले आहे. आता त्यांचे सरकार किती दिवस राहील सांगता येत नाही, असे सूचक विधानही उद्धव ठाकरेंनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR