नागपूर : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिस-यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांना बोलविण्यात आले होते. परंतू ते आले नाहीत, यावरून भाजपने २०१९ ला फडणवीस सगळे विसरून ठाकरेंच्या शपथविधीला आले होते असे म्हणत कोत्या मनाची मानसिकता अशी टीका केली आहे. यातच आता नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे.
आम्हाला शपथविधीसाठी बोलावले असते तर गेलो असतो. निरोप कोणाला दिला याची माहिती नाही. निरोप असता तर गेलो असतो असे पटोले म्हणाले. तसेच आम्हाला कधीच बोलावले नाही असे सांगत माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे, असे पटोले म्हणाले.
कंत्राटी भरती आम्ही बंद करू, असे फडणवीस म्हणाले होते. आता शिक्षकांची कंत्राटी भरती त्यांनी थांबवावी आणि नियमित शिक्षक भरती करावी. ग्रामीण भागात बस जात नाही. ग्रामीण भागात एसटी सेवा बंद करत आहे का? असा प्रश्न पडला आहे. शेतक-यांची कर्ज माफी करावी, धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतक-यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. राज्याची कायदा सुव्यवस्था सुधारावी, फडणवीस यांना गृह विभागाचा मोठा अनुभव आहे, गृह विभाग त्यांच्याकडेच राहील अशी आमची अपेक्षा आहे, महाराष्ट्र ड्रग मुक्त करावे, अशी मागणी पटोले यांनी केली.
शपथविधीची तारीख राज्यपाल जाहीर करतात. मात्र यावेळेला यांनीच घोषणा केली, भाजप आणि त्यांचे सोबती हे संविधानापलीकडचे लोक आहेत असा टोला पटोले यांनी लगावला. महायुतीच्या भांडणात आम्हाला जायचे नाही, महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या हे आमचे उद्दिष्ट आहे. काहींचे चेहरे हसरे आहेत, काहींचे चेहरे पडले आहेत. ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे, पक्षांचा नाही. आता संपूर्ण देशात ईव्हीएचा घोळ चर्चेचा विषय झाला आहे. मारकरवाडीने सरकारच्या मनात लपलेला मते चोरणारा डाकू सर्वांसमोर आणला आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
काँग्रेस गट नेता, प्रतोद निवडीवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे आमचे पत्र देणार आहोत. ही आमची परंपरा आहे आणि आता जे सत्तापक्षावर बसले आहे, त्यांचे तरी निर्णय कुठे झाले आहेत? एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे स्वतंत्र पक्ष होते पण त्यांचा निर्णय कुठे झाला आहे असा सवाल पटोले यांनी केला.