पुणे : प्रतिनिधी
राजगुरूनगरमधील एका बारमध्ये काम करणा-या वेटरने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कार्तिकी सुनील मकवाने (वय ९ वर्षे), दुर्वा सुनील मकवाने (वय ८ वर्षे, दोन्ही रा. राजगुरूनगर) अशी मृतांची नावे असून, याप्रकरणी अजय दास (वय ५४ वर्षे, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बैठक झाली. त्यांनी दोन चिमुकल्यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांशी चर्चा केली आहे. यावेळी आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले आहे.
चाकणकर म्हणाल्या, राजगुरूनगर व लोणावळा येथील घटना ही दुर्दैवी आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालेल. आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा गैरफायदा घेत होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलींची हत्या केली. एसपी पंकज देशमुख आणि त्यांची टीम चांगल्या पद्धतीने तपास कार्य करत आहे. आरोपीवर रात्री ९ वाजून ६ मिनिटांनी गुन्हा दाखल झाला आहे. रात्री पावणे बारा वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला. पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केले होते.
रात्री पावणे बारा वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या बॅरलमध्ये या दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर रेल्वे स्टेशन्स किंवा पश्चिम बंगालकडे जाणारी वाहतूक व्यवस्था, या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या आणि पहाटे चार वाजता म्हणजे साडेचार तासांमध्ये त्यांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीवर गुन्हे देखील दाखल केलेले आहेत. यामध्ये आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असे चाकणकर यांनी सांगितले आहे.