सोलापूर : होटगी रस्त्यावरील विमानतळाच्या नूतनीकरणाची कामे सुरू असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर तेथून लहान लहान विमाने उतरतील, यादृष्टीने नियोजन सुरू आहे. तेथील कामांचा जिल्हाधिकारी दररोज आढावा घेत आहेत. दरम्यान, माळढोकमुळे रखडलेल्या बोरामणी विमानतळप्रश्नी माहिती घेऊन त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनासाठी आपण यापूर्वी ५० कोटींचा निधी दिला.
परंतु तेथे माळढोकमुळे वन खात्याची जमीन मिळविण्यासाठी अडचण निर्माण झाली. माळढोक दिसला की नाही माहिती नाही, परंतु माळढोकचे अस्तित्व नाही हे आपल्याला केंद्र सरकारला दाखवून द्यावे लागेल. तसेच तेथून सूरत-चेन्नई हरित महामार्ग जात असून त्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मग विमानतळालाच काय हरकत आहे. सूरत-चेन्नई हरित महामार्ग मुद्द्यांवर आपण केंद्राकडे पाठपुरावा करू तसेच हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, असेही पवार म्हणाले.