मुंबई : प्रतिनिधी
जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोकं आश्चर्य व्यक्त करतात. सध्या माझीही परिस्थिती जपानसारखीच झाली आहे. काही लोक पक्ष सोडून गेल्याने उद्धव ठाकरेंना धक्का बसल्याचा बातम्या येतात. कोण किती धक्के देतोय ते देऊ द्या. आपण असा एकदाच धक्का देऊया की हे पुन्हा कधीच दिसणार नाहीत असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी पदाधिका-यांशी संवाद साधला. त्यावेळी फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. पक्षातील नेते पक्षाला रामराम ठोकून जात असल्याने उद्धव ठाकरे यांना धक्का असे म्हटले जाते. या धक्क्यांमुळे मी धक्कापुरूष झालो आहे. आता ही लढाई माझी एकट्याची राहिलेली नाही. ही लढाई आपली आहे. आपल्या मुळावरती घाव घालणारे कसे सरसावले आहेत आणि आपल्याच लाकडाचा दांडा करून त्याची कु-हाड बनवून हे शिवसेनेच्या म्हणजेच मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. एखादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच. पण सैनिक म्हटल्यावर शिस्त असलीच पाहिजे, असा सल्लाही ठाकरेंनी पदाधिका-यांना दिला.
विधानसभेची चूक पुन्हा होऊ देऊ नका
विधानसभा निवडणुकीत जो काही अनुभव आला, तो लक्षात घेता जी काही चूक झाली आहे ती चूक पुन्हा होणार नाही, याची मला खात्री असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आता संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. मुंबई महापालिकेच्या जागा २२७ की २३६ यावर येत्या काही दिवसांत न्यायालयाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर एप्रिल-मे मध्ये निवडणूक येऊ शकत. त्यामुळे प्रत्येक शाखेची जबाबदारी घेऊन मतदार नोंदणी तपासा, सदस्य नोंदणी करा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या.