हैदराबाद : मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी यांनी शनिवारी मंत्र्यांमध्ये खाते वाटप केले आहे. मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी यांनी महापालिका प्रशासन आणि नगरविकास, सामान्य प्रशासन, कायदा व सुव्यवस्था आणि इतर सर्व न वाटप केलेले पोर्टफोलिओ स्वतःजवळ ठेवले आहेत. दरम्यान शनिवारी एका कार्यक्रमात रेड्डी म्हणाले की, ज्याप्रमाणे सोनिया गांधी यांनी तेलंगणा राज्य निर्मितीची हमी पूर्ण केली, त्याचप्रमाणे काँग्रेस सरकार १०० दिवसांत सहा निवडणूक हमींची अंमलबजावणी करून जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी तेलंगणाची ओळख होईल.
रेड्डी यांनी ९ डिसेंबर हा तेलंगणासाठी उत्सवाचा दिवस म्हणून वर्णन केला. ९ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन यूपीए सरकारने तेलंगणाच्या स्थापनेची घोषणा केली होती. तसेच मुख्यमंत्री रेड्डी यांनी ‘महिलांसाठी मोफत बस प्रवास’ आणि ‘गरिबांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा’ या दोन योजना सुरू केल्या. काँग्रेसने जाहीर केलेल्या सहा निवडणूक ‘हमींचा’ हा भाग आहे. रेवंत रेड्डी यांनी विधानसभेच्या संकुलात उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का, अनेक मंत्री, एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या दोन्ही योजनांचा शुभारंभ केला.