माले : मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू पुन्हा बरळले असून आम्ही लहान असलो तरी आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळणार नसल्याचा इशारा भारताला दिला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौ-यावरून आलेल्या मुइझ्झू यांनी भारतावर निशाणा साधला आहे.
मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असताना मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी मोठे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोणत्याच देशाला आमच्यावर दादागिरी गाजवण्याचा अधिकार नाही, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. आम्ही लहान देश असू पण, यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपमध्ये गेले होते. या त्यांच्या दौ-यावरून मालदीवच्या काही नेत्यांना मिरची लागली होती. त्यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.