बारामती : राज्य सरकारने बारामतीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित आहेत. शरद पवार यांनी यावेळी राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. तुम्ही जर तरुणांच्या हाताला काम दिले, तर आम्ही तुमच्यासोबत राहू. ही खात्री मी तुम्हाला देतो, असे शरद पवार यांनी सांगितले. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते.
रोजगारासाठी सरकार पावलं टाकतंय ही चांगली गोष्ट आहे. राजकारण एका बाजूला असतं. मुलांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे जे कराल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू. एवढी खात्री मी तुम्हाला देतो, असे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विविध संस्थांची माहिती दिली. तसेच विद्या प्रतिष्ठानमधून कोणते शिक्षण दिले जाते? किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो? कोणत्या कोणत्या कंपन्या या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतात याची माहितीही शरद पवार यांनी दिली.
जे करायचं ते नंबर एकच
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. राज्यातील नंबर एकचे बस स्थानक बारामतीत आहे. जे करायचं ते नंबर एकच काम करायचं हा माझा प्रयत्न असतो. आज जे काही काम झालंय ते केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमुळेच शक्य झालंय, असे अजित पवार म्हणाले.
नंबर एकचा तालुका करेन
या इमारतीचं काम सुरू झालं. प्रत्येक इमारतीचा पाया घातल्यापासून आजपर्यंत ४० वेळा मी या कामाची पाहणी केली. माझं मोठेपण सांगत नाही, पण हे काम झालंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मी ग्वाही देतो की, महाराष्ट्रातील नंबर एकचा तालुका हा बारामती तालुका करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राजकारणविरहित काम
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाषण केले. शरद पवार आणि अजित पवार स्टेजवर आहेत. आमचं सरकार लोकाभिमुख आहे. सामान्यांचं आहे. राजकारणविरहित आहे. विकासात आम्ही राजकारण आणत नाही. सर्वांना सोबत घेऊन आमचं काम करतो हे त्यातून दिसतं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.