22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदेंचे कल्याण; भाजपची डोकेदुखी?

शिंदेंचे कल्याण; भाजपची डोकेदुखी?

- कल्याण लोकसभा मतदारसंघ - मतदान ४ टक्क्यांनी वाढले

कल्याण : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. सहाव्या टप्प्याचे मतदान २५ मे रोजी होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचा टप्पा संपला आहे. अखरेच्या टप्प्यात गेल्यावेळीपेक्षा कल्याण-डोंबिवली मतदारसंघात मतदान चार टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना झाला तर त्यांची हॅट्ट्रिक होणार. मात्र असे झाले तर भविष्यात भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदारकीची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. कल्याणमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. कल्याण-डोंबिवली भाजपचा गड राहिला. भाजपची ताकद या मतदारसंघात अधिक आहे. त्यामुळे शिंदेंची हॅट्ट्रिक भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.

काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवलीतील चाकरमानी मतदार हा भाजपच्या गोटात होता. त्यामुळे भाजप इथे बहरली. मात्र गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे इथल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या. म्हणूनच उमेदवारीवरून प्रचंड नाराजीनाट्य रंगले त्यामुळेच श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीच्या घोषणेला फार उशीर झाला. आता शिंदेंची हॅट्ट्रिक झाल्यास त्यांचे राजकीय वजन वाढणार आहे.
तर दुसरीकडे शिंदेंच्या विरोधात उभ्या असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी कल्याण पूर्व, मुंब्रा आणि कळवा, उल्हासनगरातील काही भागांत जोरदार प्रचार केला. तिथून त्यांना अधिक मतदानाची अपेक्षा आहे.

लोकसभेत भाजपाची ताकद
कल्याण लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा येतात. यात गणपत गायकवाड कल्याण पूर्व, रवींद्र चव्हाण डोंबिवली तर कुमार अयलानी उल्हासनगर असे ३ भाजपाचे आमदार आहेत. तर राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून मनसेचे तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्राचे आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथमधून आमदार आहेत. एकंदरीतच या मतदारसंघात भाजपाची सर्वाधिक राजकीय ताकद आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार
श्रीकांत शिंदेंना ५ लाख मतांनी विजयी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. हा निर्धार त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवला. मात्र शिंदेंच्या विरोधात उभ्या असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी जोरदार प्रचार केला.
कल्याण-डोंबिवली मतदारसंघामधील हजारो मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने याचा फटका शिंदेंना बसणार की दरेकरांना याची उत्सुकता आहे. मोठ्या मताधिक्याने विजय झाल्यास श्रीकांत शिंदेंचे राजकीय कल्याण होईल. मात्र शिंदेंची ठाण्यासारखी कल्याण-डोंबिवलीत वाढणारी ताकद भाजपसाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR