22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडावेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर विजय

वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर विजय

गाबा : वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजने दुस-या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियावर तब्बल २७ वर्षांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र विंडिजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २०७ धावांवर रोखले. विंडिजने या विजयासह २ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.

ऑस्ट्रेलियाने तिस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १९ ओव्हरमध्ये २ विकेट्स गमावून ६० धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चौथ्या दिवशी विजयासाठी आणखी १५६ धावांची गरज होती. तर दु्स-या बाजूला विंडिजला ८ विकेट्स हव्या होत्या. चौथ्या दिवशी दोन्ही बाजूने कडवी टक्कर पाहायला मिळाली. स्टीव्हन स्मिथने चिवटपणे एक बाजू लावून धरली होती. स्मिथने टीमसाठी नाबाद ९१ धावा केल्या. मात्र विंडिजच्या गोलंदाजांनी कांगारूंना २०७ धावांवर गुंडाळत कार्यक्रम केला.

विंडिजने टॉस जिंकून पहिल्या डावात ऑलआऊट ३११ धावा केल्या. कांगारूंनी या प्रत्युत्तरात ९ बाद २८९ धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे विंडिजला २२ धावांची आघाडी मिळाली. विंडिजने या आघाडीसह दुस-या डावात १९३ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१६ धावांचे आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलिया हे आव्हान सहज पूर्ण करेल, असे वाटत होते. मात्र विंडिजने ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतराने झटके देणे सुरू ठेवले होते. तर दुस-या बाजूने ओपनर स्टीव्हन स्मिथ याने एक बाजू लावून धरली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दुस-या बाजूने अपेक्षित साथ न मिळाल्याने स्टीव्हन स्मिथ याची नाबाद ९१ धावांची खेळी वाया गेली.

ऑस्ट्रेलियाकडून दुस-या डावात स्टीव्हन व्यतिरिक्त कॅमरून ग्रीन याने ४२, मिचेल स्टार्क २१, उस्मान ख्वाजा आणि मिचेल मार्श प्रत्येकी १०-१० धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांचा १०च्या आत कार्यक्रम झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR