23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्र१० वर्षांत देशाचे दिवाळे निघाले त्याचे काय?

१० वर्षांत देशाचे दिवाळे निघाले त्याचे काय?

उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

नाशिक : २२ जानेवारीला प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त देशात दिवाळी साजरी करायला हरकत नाही. पण, १० वर्षांत देशाचे दिवाळे निघाले आहे, त्याबद्दल चर्चा होणे गरजेचे आहे, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे. तसेच, २२ जानेवारीला काळाराम मंदिरात येण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण देणार आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. ते ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘२२ जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रभू श्री राम मंदिराचे दर्शन घेत गोदावरी तीरी आरती करणार आहोत. २३ जानेवारीला शिवसेनेचे शिबिर आणि जाहीर सभा होणार आहे.’

‘‘अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराच्या शेजारी बाबरी मशिद बांधण्यात आली होती. तसेच, सोमनाथाच्या मंदिराचा अनेकवेळा विध्वंस करण्यात आला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन सोमनाथाच्या मंदिराचे पुनर्निर्माण केले. मात्र, सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले. तेव्हा सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली होती,’’ असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

देशाच्या अस्मितेचा प्रश्न
वर्षानुवर्षे प्रभू श्री राम मंदिरासाठी चाललेल्या लढ्याला अंतिमत: सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण द्यावे आणि प्राणप्रतिष्ठापना त्यांच्या हस्ते व्हावी, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

श्री राम मंदिर व्हावे ही माझीही इच्छा
‘मी कडवट हिंदुत्ववादी आहे. श्री राम मंदिर व्हावे ही लाखो भक्तांसह माझीही इच्छा आहे. श्री राम मंदिरासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका जनतेला माहिती आहे,’’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR