नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरबाबत एक मोठे विधान केले आहे. आज दिल्ली येथे जम्मू-काश्मीर आणि लडाख: हिस्टोरिकल अकाउंट ऑफ कंटिन्युटी अँड कनेक्टिव्हिटी या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना त्यांनी कलम ३७० आणि दहशतवादावर प्रतिक्रिया दिली. तसेच, अप्रत्यक्षपणे पाकव्याप्त काश्मीरही लवकरच भारताचा भाग होईल, असे विधान केले.
अमित शाह म्हणतात, ब्रिटिशांच्या काळात लिहिलेल्या इतिहासाची व्याख्याच चुकीचा होती. संपूर्ण जगाशी भारताचे संस्कृतीचे नाते आहे. या देशाकडे फक्त भूराजकीय दृष्टिकोनातून पाहणा-यांना देशाने, भारताची व्याख्या करू नये. काश्मीरमध्ये जी कला, वाणिज्य आणि संस्कृती होती, ती हळूहळू संपूर्ण भारतात पसरली गेली, ती आजही भारताचा अविभाज्य भाग होती आणि कायम राहील.
मोदी सरकारने कलम ३७० रद्द करण्याचे काम केले. या ३७० ने काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाची बीजे पेरली. ३७० हटवल्यानंतर दहशतवादी घटना कमी झाल्या. खो-यातील दहशतवादाची परिसंस्था उद्ध्वस्त झाली. अनेकदा लोक मला विचारतात की, कलम ३७० आणि दहशतवादाचा काय संबंध आहे? त्यांना कदाचित माहित नसेल की, कलम ३७० नेच खो-यातील तरुणांच्या मनात फुटीरतावादाची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला. देशाच्या इतर भागात दहशतवाद का आला नाही? गुजरात आणि पंजाब पाकिस्तानला लागून आहेत.