नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायम ठेवला असून पुढील वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली जावीत, असे सांगितले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताच्या अखत्यारीत कधी आणले जाईल हे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगावे कारण त्यांनी संसदेत असे विधान केले होते.
तसेच सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका जाहीर करून पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करावा, असेही ते म्हणाले. लोकसभेतील काँग्रेसचे नेते चौधरी यांनी संसदेच्या संकुलात पत्रकारांना सांगितले की, “आम्ही सभागृहात वारंवार विनंती करत होतो की, जर तुम्ही एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवले, तर तुम्ही पूर्ण राज्याचा दर्जा कधी बहाल करणार? काँग्रेस नेत्याने सांगितले की, “गृहमंत्री अमित शहा सभागृहात वारंवार सांगत होते की ते पीओके नियंत्रणात आणू. त्यांनी सांगावे की, पीओके नियंत्रणात कधी आणणार? निदान निवडणुकीपूर्वी पीओके ताब्यात घ्या, असे आवाहन त्यांनी केला आहे. चौधरी म्हणाले की, लवकरात लवकर निवडणुका जाहीर झाल्या पाहिजेत आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला पाहिजे.