परभणी : महिलांना बसमध्ये ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला खरा, परंतु बस उपलब्ध नसतील तर या सवलतीचा उपयोग काय? असा प्रश्न करत आपण परभणी विभागासाठी ५०० बसची मागणी केली होती परंतु केवळ १० बस देण्यात आल्या आहेत. आधीच दुरुस्तीच्या नावाखाली परभणी विभागातून १०० बस कमी केल्या आहेत, किमान त्या तरी पुन्हा द्या अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांनी केली आहे.
आ. डॉ. पाटील यांच्या प्रयत्नातून तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून परभणीला अद्यावत बसपोर्ट मिळाले. या बसपोर्टचे काम ९५ टक्के पूर्णत्वाला गेले असून बस स्थानक सुरू झाले आहे. उर्वरित कामासंदर्भात आ. पाटील यांनी शनिवारी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी आ. पाटील यांनी संपूर्ण बस स्थानकाची फिरून पाहणी केली व बस स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर लवकरच मराठी चित्रपटगृह सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, किमान प्रवाशांची वाढती संख्या पाहता कमी केलेल्या १०० बस पुन्हा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासोबतच या भागातून वाहणा-या डिग्गी नाल्याचे खोलीकरण तसेच शहरातील रखडलेले विकासाचे प्रकल्प मार्गी लागावे यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. पाटील म्हणाले.
यावेळी सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, आगार व्यवस्थापक काळम पाटील, विभागीय भांडार अधिकारी संदीप मुंडे, सोपान अवचार, अरविंद देशमुख, रवी पतंगे, नवनीत पाचपोर, संभानाथ काळे, वाहतूक अधिकारी साळुंखे, कनिष्ठ अभियंता शेख वसीम, अजित यादव, रामराव डोंगरे, स्वप्नील भारती, केदार दुधारे, हरमोहन सिंग टाक, असलम शेख, अजय चव्हाण, बंडू नाना बिडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.