मुंबई : विजयादशमी दिवशी दसरा मेळाव्याने मुंबई गाजते, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून विचारांचे सोनं लुटण्याची प्रथा शिवसेनाप्रमुख दिवंग बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. आता, हीच परंपरा पुढे जात असून गेल्या २-३ वर्षांपासून शिवसेनेतील फुटीनंतर दोन दसरा मेळावे संपन्न होत आहेत. एकीकडे ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होत आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटरमध्ये होत आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवरील दसरा मेळाव्यातून अतिवृष्टी आणि शेतक-यांच्या प्रश्नावर भाजप, महायुती सरकार आणि नाव न घेता एकनाथ शिंदेवर टीका केली. तर, एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. एकनाथ शिंदेंच्या अगोदर व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भाषणे झाली. एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणाहून १५ ट्रकद्वारे पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदे व्यासपीठावर भाषणासाठी गेल्याचे पाहायला मिळाले. तर, व्यासपीठावर कुठलाही सत्कार न स्वीकारता त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
यावेळी, बळीराजा संकटात असल्याने राज्यभरातील शिवसेना पदाधिका-यांना त्यांच्या जिल्ह्यात थांबायला सांगितले. बळीराजाचं दु:ख मोठं आहे, त्याचं पशुधन वाहून गेलंय, जमीन खरडून गेलीय, घरांची पडझड झालीय. मी स्वत: बांधावर जाऊन बळीराजाचे दु:ख पाहिले आहे. त्यामुळेच, बाळासाहेबांचा मुलमंत्र २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण आपण जपत आहोत. जिथं संकट, तिथं हा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. मी एका शेतक-याचा मुलगा आहे, म्हणून शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही. पूरग्रस्ताची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी शेतक-यांना मदत दिली जाईल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे.
कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी घेऊन दौ-याला जाणारा एकनाथ शिंदे नाही. फेसबुक लाईव्ह करणारा हा एकनाथ शिंदे नाही, असे म्हणत शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, हे कुठेही गेले तरी माझ्या हातात काही नाही म्हणतात, मग होतं तेव्हा तरी कुठं दिलं. द्यायलाही दानत लागते, ही लेना बँक नाही, देना बॅक आहे. आम्ही किती तरी योजना दिल्या, आम्ही दोन्ही हाताने दिले, कधी म्हटलं नाही माझा हातात काही नाही. माझे दोन हात नाही तर समोर बसलेले या शिवसैनिकांचे हातही माझेच, हे व्यासपीठ हे शिवसैनिक ही माझी संपत्ती आहे. प्रॉपर्टीचा भुकेला मी नाही. बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती आहे. मगा, रामदास कदम म्हणाले ३० वर्षे पालिका लुबाडली, कुठे गेली माया? लंडनला असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.
खून का बदला खून, गोली का जबाव गोली से
राज्यात याचं सरकार असतं तर काहीच सुरू झालं नसतं, हे स्थगिती सरकार होतं. मी मुख्यमंत्री झालो हे सर्व स्पीडब्रेकर उडवून टाकले. सर्व सण बंद होते, मंदिरं बंद होती, मी आलो आणि सर्व हटवलं. दुस-या टप्यात आम्ही एकत्र येऊन आजही वेगाने काम करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या मागे उभे आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. पहलगाममध्ये आपल्या बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम पाकडयांनी केलं, त्यांना धडा शिकवण्याचं काम मोदींनी केले. खून का बदला खून, गोली का जवाब गोली से.. दिला. पी चिंदबरमं म्हणाले २६/११ ला दबाव होता, म्हणून हल्ला केला नाही, ही भारतीयांशी केलेली गद्दारी आहे. निष्पाप लोकं बळी पडले. मात्र, कुणाच्या तरी दबावाला बळी पडून उत्तर दिलं नाही, मोदीजी दबावाला बळी पडले नाहीत, आम्ही आणि पाकिस्तान बघू हे सांगणारे मोदी नाहीत, असे म्हणत मोदींचे कौतुकही शिंदेंनी केले. तसेच, यांनी त्यांचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्यायला हवा होता, यांनी आपल्या लष्करावर संशय घेतला याचा फायदा पाकिस्तानने घेतला. राहुल गांधी याचं हे पाकिस्तानी प्रेम आहे, म्हणून यांना आपल्यावर टिका करण्याचा अधिकार नाही, असेही शिंदेनी म्हटले.
जे सोडून गेले ते लोकं का जात आहेत, त्याचं आत्मपरीक्षण करणार की नाही. जगात असा कोणी अध्यक्ष नसेल जो स्वत:च्याच लोकांना संपवतो. आज बाळासाहेबांसमोर किती लोकं बसायची आता काय परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांची सावली तरी सोबत राहिल का? असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. निवडणुका आल्या की मुÞबई मराठी माणसाचे नाव घेतील, पण हा मराठी माणूस कुठे आहे? मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही माय का लाल तोडू शकणार नाही. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच राहिल. त्यांच्यावर आता कोणी विश्वास ठेवणार नाही, मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत आणल्या शिवाय राहणार नाही, असेही शिंदेंनी म्हटले.
दसरा मेळाव्याच्या ठिकाणी वैद्यकीय मदत
शिंदेच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला आहे. येथे सभेसाठी आलेल्या शिवसैनिकांना अचानक काही त्रास जाणवला तर त्यासाठी बीपी, शुगर चेक करून औषधे दिली जात आहे. सर्दी, खोकला ताप, यासह इतर आजारांववरील औषधं दिली जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी मुस्लिम बांधव देखील उपस्थित झाल्याचे पाहायला मिळाले. मानखुर्द ह्या परिसरातून शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव मेळाव्याचे ठिकाणी पोहोचले होते. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून पदाधिकारी कार्यकर्ते पोहोचले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.