23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसंपादकीयही मुजोरी येते कुठून?

ही मुजोरी येते कुठून?

पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका धनदांडग्याच्या अल्पवयीन पण मुजोर बाळाने आपल्या भरधाव कारने मोटारसायकलवरून जाणा-या दोघांना उडवले व त्यात त्या दोन निष्पाप तरुणांचा जागीच जीव गेला. या अपघाताने या दोन तरुणांच्या डोळ्यातील भविष्याच्या स्वप्नांचा तर चक्काचूर झालाच पण त्यांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. मात्र, त्या कुटुंबांना आधार द्यायला, त्यांचे सांत्वन करायला व त्यांना न्याय मिळवून द्यायला कोणी धावले नाही. सगळी धावाधाव झाली ती मुजोर बाळाचा बचाव करण्यासाठी, कायद्यातील पळवाटा शोधण्यासाठी व बाळाला या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी! विशेष म्हणजे यंत्रणा व व्यवस्थेने त्यांच्यावर असणारे ‘बाळाच्या बचावा’चे परम कर्तव्य चोख पार पाडले.

न्यायालयात ‘मी दारू पितो व माझ्या वडिलांना ते माहिती आहे,’ असे कबूल करणा-या या बाळाला त्याच्या मुजोर कृत्यासाठी शिक्षा काय सुनावली जाते तर अपघात या विषयावर निबंध लिहिण्याची व वाहतूक नियमनात काही काळासाठी सहभागी होण्याची! या मुजोर बाळाने ज्या परवाना नसणा-या गाडीने दोघांना उडविले त्या गाडीचा चालक न्यायालयात सांगतो की, बाळाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे, असे बाळाच्या सज्ञान पित्यानेच त्याला सांगितले होते आणि म्हणून त्याने निमूटपणे मालकाच्या आदेशाचे पालन केले व मद्यधुंद बाळाच्या हाती गाडीचे स्टेअरिंग सोपवले. कायद्याच्या एवढ्या चिंधड्या सर्रास उडविल्या गेल्याचे स्पष्ट होऊनही या मुजोर बाळाला त्याच्या मुजोर कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे असे ना यंत्रणेला वाटते, ना व्यवस्थेला! या अपघातानंतरच्या ४८ तासांच्या घटनाक्रमाने जसा सामान्यांच्या यंत्रणा व व्यवस्थेवरच्या विश्वासाच्या चिंधड्या उडवल्या तसेच यंत्रणा व व्यवस्थेच्या अब्रूची लक्तरेही वेशीवर टांगली! अशा घटनांनंतर सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न निर्माण होतो तो हाच की, कायदा, नियम सर्रास पायदळी तुडविण्याची ही मुजोरी येते तरी कुठून? कल्याणीनगरच्या अपघातानंतर ४८ तासांत जो घटनाक्रम घडला त्यातच या प्रश्नाचे थेट उत्तर आहे.

पैशाने यंत्रणा, कायदाच काय पण निष्पापांचे जीवही विकत घेता येतात व आपले कुणीही काही वाकडे करू शकत नाही, या मुजोर मनोवृत्तीला आपल्या यंत्रणा व व्यवस्थांनीच खतपाणी घालून व्यवस्थित जपले आहे. त्यामुळेच आज कुठल्याही शहरात व गावात कायद्यांचे, नियमांचे सर्रास उल्लंघन होताना उघड्या डोळ्यांनी पहावे लागते. मानवी स्वभावानुसार माणसाला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईटाची लवकर भुरळ पडते. ती नियंत्रित करण्यासाठीच नियम व कायद्यांची गरज पडते. मात्र, यंत्रणा व व्यवस्था, ज्यांच्यावर कायद्यांच्या व नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे, त्याच जर कायदे पायदळी तुडवणा-यांचे संरक्षण व बचाव करण्यासाठी झटत असतील तर मग सामान्य माणसाचा यंत्रणा व व्यवस्थेवर विश्वास राहील कसा? हाच यक्ष प्रश्न! पुण्यासारख्या शहरात सामाजिक संघटना व नागरिकांचा दबाव गट अद्याप कार्यरत असल्याने मुजोर बापाच्या मुजोर बाळाचे माजोरी कृत्य दाबून टाकण्याचा यंत्रणा व व्यवस्थेचा अश्लाघ्य खटाटोप उघडा पडला व स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालावे लागले.

तेव्हा कुठे यंत्रणांना आपल्या जबाबदारी व कर्तव्याची जाणीव झाली आणि आपल्या अल्पवयीन ‘बाळा’ला परवाना नसणारी कार सोपविणा-या, त्याच्या पार्टीला परवानगी देणा-या बापाला, अल्पवयीन मुलांनाही सर्रास दारू विकणा-या पब मालकाला, पबच्या व्यवस्थापकाला अटक झाली, त्यांची कोठडीत रवानगी झाली व जामिनावर सुटका झालेल्या मुजोर बाळाची सुरक्षेच्या कारणावरून का असेना बालसुधार गृहात रवानगी झाली. या प्रकरणाने एकंदर आपल्या यंत्रणा व व्यवस्थेचे धिंडवडे कसे निघाले आहेत याचे दर्शनच समाजाला घडविले आहे. साहजिकच समाजात याबाबत सार्वत्रिक संताप व उद्वेग व्यक्त झाला. मात्र, या संतापामागे हतबलता व निराशेचीच भावना जास्त प्रकर्षाने दिसून येते. या व्यवस्थेत आपले काही खरे नाही, येथे आपल्यासारख्यांना न्याय मिळण्याची शक्यता नाही, येथे फक्त पैसा बोलतो, अशा ज्या प्रतिक्रिया या प्रकरणानंतर व्यक्त झाल्या त्यातून समाजाची हतबलताच अधोरेखित होते. यंत्रणा व व्यवस्थेवरचा विश्वास समूळ उडविणा-या अशा घटना आपण सुशिक्षित समाज म्हणून किती रसातळाला जातो आहोत, याचे द्योतकच आहे.

समाजात आज सामान्यांच्या मनात जी भयग्रस्तता आहे त्यामागे कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारी पोलिस यंत्रणा, जनसेवेचा वसा घेतल्याचे अहोरात्र भासवणारे लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्था आणि एकंदरच संपूर्ण व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची, अनीतीची, बेपर्वाईची भयानक कीड कारणीभूत आहे. त्यामुळे समाजातील चांगल्या कामाचा आवाज क्षीण झाला आहे. सजग, सुसंस्कृत, सुशिक्षित समाज म्हणून हे आपलेच मोठे अपयश आहे. ज्या कल्याणीनगर भागात हा प्रकार घडला तेथे पब व दारू गुत्त्यांची गर्दी आहे. विशेष म्हणजे यापैकी किती पब परवाना घेऊन उघडलेले आहेत, याचीच माहिती यंत्रणेकडे उपलब्ध नाही. मग तिथे नियमांचे पालन होते की नाही? हे कोण तपासणार व त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार? हा प्रश्नच! एखादी अशी घटना घडली की, तेवढ्यापुरती जोरदार चर्चा होते, मग यंत्रणेलाही इच्छा नसताना जागे होऊन कारवाईचे नाटक रंगवावे लागते,

घटनेवरून एकमेकांवर जोरदार चिखलफेक करून राजकारणाची हौस पुरवून घेतली जाते आणि काही काळानंतर हे सगळे थंडगार होते ते अशीच दुसरी घटना घडेपर्यंत! १९९९ चे तत्कालीन नौदल प्रमुख यांच्या चिरंजीव व नातवाने आपल्या बीएमडब्ल्यूने ६ लोकांना चिरडल्याचे प्रकरण असो, २००२ साली अभिनेता सलमान खानच्या कारने रात्री फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडण्याचे प्रकरण असो की आताचे हे कल्याणीनगरचे प्रकरण! प्रत्येकवेळी सामान्यांच्या जीवाला व्यवस्थेत कवडीचेही मोल नाही, हाच अनुभव समाजाला वारंवार घ्यावा लागतो. त्यातूनच समाजात नियम पाळण्याच्या जाणिवेपेक्षा नियम मोडण्याचे, कायदे पायदळी तुडवण्याचे आकर्षण वाढत चालले आहे. मोठ्या शहरांतच नव्हे तर गावोगावी याचा सर्रास अनुभव सामान्यांना रोजच येतो. नियमांचा, कायद्याचा धाक कमी होण्यामागे याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणा-या यंत्रणांचा मुर्दाडपणा, या यंत्रणांना लागलेली भ्रष्टाचाराची कीड व अशा या मुर्दाड व भ्रष्ट यंत्रणेला असणारा राज्यकर्त्यांचा आशीर्वाद जसा कारणीभूत आहे तसाच समाज म्हणून आपली आटत चाललेली सजगता व सक्रियताही कारणीभूत आहे. ही मुजोरी येते कुठून? या प्रश्नाचे उत्तर या सगळ्या परिस्थितीत दडलेले आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR