मुंबई : रुपया असाच पडत राहिला तर भारतीय उद्योजकांना परदेशी चलन मिळवणे कठीण जाईल. ज्यांची मुले परदेशात शिकत आहेत, त्यांचे बजेट उद्ध्वस्त होईल. परदेशातील विद्यार्थ्यांना भारतातून जास्त रक्कम पाठवावी लागेल. सामान्य भारतीयांचे हाल वाढतील. रुपयाचे अवमूल्यन चिंताजनक आहे.
देशात काँग्रेसचे राज्य असताना गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना रुपयाचे अवमूल्यन पाहवत नव्हते. डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची घसरण पाहून त्यांच्यातला राष्ट्रवाद उसळ्या मारीत होता. मोदी म्हणत, ‘‘जसजसा रुपया घसरतोय तसतशी भारताची प्रतिष्ठाही घसरत असते, पण भारताच्या प्रतिष्ठेची काँग्रेसला चिंता नाही. मोदी यांना रुपयाच्या घसरणीची चिंता वाटत होती तेव्हा रुपया जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत ‘६०’ होता व आज मोदी काळात ‘८७’ इतका घसरला. म्हणजे काँग्रेसच्या तुलनेत मोदी काळात भारताची प्रतिष्ठा व रुपया सर्वाधिक पडला आहे.
तरीही मोदी हे विश्वगुरू असल्याचा डंका त्यांचे भक्त पिटत आहेत. मोदींचे अंधभक्त सर्वच क्षेत्रांत आहेत. अक्षय कुमार, अनुपम खेर, जुही चावला या सिने कलावंतांचाही त्यात समावेश आहे. २०१३ मध्ये १ डॉलर ६० रुपये इतका होता व रुपयाची ही घसरण पाहून जुही चावला बेजार झाली होती. तेव्हा रुपयाच्या चिंतेने जुही चावलाने एक जोरदार ट्विट केले होते. देवाची कृपा आहे, आपल्या अंडरवेअरचे (म्हणजे चड्डीचे) नाव ‘डॉलर’ आहे. चड्डीचे नाव ‘रुपया’ असते तर सारखी खाली पडत राहिली असती. आज एका डॉलरचा भाव ८६.६० पर्यंत जाऊन पोहोचला आहे. हा सगळ्यात नीचांक आहे.
देशात आर्थिक अराजक
जुही चावला आता कोठे आहे? सिनेमावाल्यांच्या ‘चड्डया’ आता खाली पडत नाहीत काय? दुस-या एका ‘ट्विट’मध्ये जुही चावलाने ‘रुपयाला स्वत:ला वाचविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डॉलरला राखी बांधणे,’ असा टोला हाणला होता. मग आता सर्वात नीचांकी गेलेल्या रुपयाला वाचविण्यासाठी जुही चावला डॉलरला संक्रांतीच्या पतंगाचा मांजा बांधायला सांगणार आहे का? देशाला स्वातंर्त्य मिळाल्यानंतर एका डॉलरची किंमत एक रुपया इतकी होती. आज एक डॉलर घेण्यासाठी साधारण ८७ रुपये द्यावे लागतात. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे व देशात आर्थिक अराजक माजले आहे. देशावर कर्जाचा डोंगर वाढतो व तिजोरीचा रिकामा डबा होतो तेव्हा रुपयाची घसरण जागतिक बाजारात सुरू होते हे साधे अर्थशास्त्र आहे. रुपया अस्थिर आहे याचा सरळ अर्थ भारतात विकासाची गती मंदावली आहे व सरकार विकासकामे करण्यात कमी पडले आहे.