भूम : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना जाहीर झाली आहे. आपल्यालाच किंवा आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्नशिल असलेल्या शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते, कार्यकर्ते यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. परिणामी या दोन्ही पक्षातील नाराज पदाधिका-यांनी राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. महायुतीतील राजीनामा सत्राचा फायदा अर्चनाताई पाटील (घड्याळाला) होणार की ओमराजे निंबाळकर (मशालीला) होणार, याकडे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिका-यांनी उमेदवार बदला, अशी भूमिका घेऊन पदाचे राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेले प्रा. सुरेश बिराजदार यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्याने त्यांच्या पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी दिली पण निष्ठावान असलेल्या प्रा. बिराजदार यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. सध्या धाराशिव जिल्ह्यामधील भूम, परंडा, वाशीच्या पदाधिका-यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे.
घड्याळ चिन्ह हद्दपार करण्यासाठी आम्ही लढलो, फिरलो. धनुष्यबाणाला मते मागितली. परंतु या लोकसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हाला मत मागण्याची वेळ शिवसैनिकावर आल्याचे पदाधिकारी बोलत आहेत. ज्या कुटुबांच्या घरात पिढ्यानपिढ्या राजकारण आहे, त्याच घरात पुन्हा उमेदवारी दिली जात असल्याने बाकीच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का, असाही खोचक सवाल केला जात आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणा-या उमद्या नेतृत्वाला उमेदवारी द्यायला हवी होती. परंतु जिल्ह्यामध्ये धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचे काम महायुतीच्या नेत्यांनी केले आहे. हे अत्यंत नींदनीय असून याचा आगामी निवडणुकीत निश्चितपणे परिणाम होणार आहे. मतदार राजा मतदान रूपाने दाखवून देईल. असे सांगत घराणेशाही सोडून इतर कोणालाही तिकीट दिले असते तर निश्चितपणाने आम्ही सर्व तन-मन-धनाने कामाला लागलो असतो. परंतु जे नको हवे होते, तेच आमच्या पुढे उभा केले असल्याने आम्ही आमच्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे शिवसैनिक सांगत आहेत. वेळ अजूनही गेलेली नाही. जिल्ह्यात शिवसेना अबाधीत राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार करून योग्य त्या नेत्याला उमेदवारी देऊन शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह द्यावे, अशी अपेक्षा केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्येही नाराजीचा सूर निघत आहे. दरम्यान पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे दिले असून नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या राजीनामा अस्त्राचा फायदा मशालीचा होणार की, घड्याळाला होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.