19.3 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्र‘औरंगाबाद पूर्व’चा आमदार कोण

‘औरंगाबाद पूर्व’चा आमदार कोण

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यात सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. वाढलेले मतदान भाजपच्या फायद्याचे ठरते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यांचा हा दावा किती खरा किती खोटा हे २३ तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व या विद्यमान मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघात ६०.६३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अतुल सावे हे गेल्या दोन टर्मपासून पूर्व मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अतुल सावे यांना यावेळी विजयाची हॅट्ट्रिक साधायची आहे. त्यांना एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी कडवी झुंज दिल्याचे दिसते.

महायुती विरुद्ध एमआयएम अशी थेट टक्कर असलेल्या पूर्व मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलत मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने अफसर खान यांना उमेदवारी दिली. याशिवाय एमआयएममधून बाहेर पडलेले डॉ. गफार कादरी यांनी समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळवत एमआयएमला आव्हान दिले. तीन प्रमुख मुस्लिम उमेदवार आणि याशिवाय छोटे-मोठे आणखी १२ मुस्लिम अपक्ष मैदानात असल्याने मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

महायुतीचे अतुल सावे यांच्यासाठी ही जमेची बाजू असली तरी मतदारसंघातील मराठा मतदार निर्णायक भूमिकेत असणार आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाची महायुतीच्या विरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीनंतर कायम आहे. काँग्रेस महाविकास आघाडीने आधी एम. के. देशमुख यांच्या रूपाने मराठा उमेदवार देत पूर्व मध्ये चुरस निर्माण केली होती. मात्र त्यानंतर अचानक देशमुख यांनी माघार घेतली आणि लहू शेवाळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. काँग्रेसने तडकाफडकी हा बदल का केला? याबद्दल अजूनही मतदारसंघांमध्ये चर्चा होताना दिसते.

इम्तियाज जलील यांनी निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. याशिवाय मराठा आरक्षणाच्या त्यांच्या मागणीला एमआयएमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. निवडणूक प्रचारादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्याच्या अटीनुसार शपथपत्र लिहून देत निवडून आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवण्याची हमी इम्तियाज जलील यांनी जाहीर सभेतून देत मराठा मतदारांना साद घातली होती. त्यांच्या या सादेला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची साथ मिळाली का? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

पतंगाला हवा मिळणे अवघड
इम्तियाज यांना एकूण मुस्लिम मतांच्या ६० ते ७० टक्के मतदान झाल्याचा दावा केला जात आहे. तो जरी खरा मानला तरी इम्तियाज जलील यांच्या विजयाचे गणित जुळून येणे कठीण दिसते. त्यांना मराठा, ओबीसी मतदारांची काही प्रमाणात का होईना साथ मिळाल्याशिवाय पूर्वमध्ये पतंगाला हवा मिळणे अवघड आहे. दुसरीकडे अतुल सावे यांची मदार भाजपचा बेस असलेल्या ओबीसी मतदारांवर आहे. मात्र सावे यांनाही विजयासाठी मराठा मतदान काही प्रमाणात होणे आवश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR