मुंबई : प्रतिनिधी
मंत्रालयात बसलेल्या अधिका-यांना शेतक-यांबद्दल आस्था नाही. लाखो करोडोंचा पगार घेतात पण शेतक-यांच्या अर्जांचा निपटारा मात्र वेळेत करत नाहीत. मंत्रालयातील हे आधुनिक वाल्मिक कोण आहेत? असा सवाल करत, भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सरकारला घरचा आहेर केला.
चंद्रपूर, जिल्ह्यात धान, कापूस पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. कृषी राज्य मंत्री आशिष जयस्वाल मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरावर आक्षेप घेत कृषी विभागातील अधिका-यांचे वाभाडे काढले. सचिवांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिका-यांनी दिलेली माहिती आहे असे आम्हाला सांगू नका. आम्ही सचिवालयाचे मंत्रालय केले आहे. राज्य सरकार एकीकडे सरकारी कर्मचा-यांच्या पगार आणि निवृत्तीवेतनावर २ लाख ९० हजार कोटी खर्च करते आणि शेतक-यांना मदत करताना हात मागे का घेता? असा सवाल त्यांनी केला.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले हल्ल्यांनंतर राज्यमंत्री जयस्वाल यांनी धान उत्पादक शेतक-यांच्या मदतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवू असे आश्वासन दिले.