21.4 C
Latur
Monday, October 21, 2024
Homeलातूरहिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा खरा लाभार्थी कोण?

हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा खरा लाभार्थी कोण?

लातूर : विशेष प्रतिनिधी
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आता मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक घडामोडी झाल्या. या पाच वर्षात राज्याने तीन बंड, तीन मुख्यमंत्री पाहिले. याच काळात आरक्षणासाठी ओबीसी, मराठा, धनगर समाजाने केलेला संघर्षही महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे ओबीसी, मराठा आणि धनगर मतांचे ध्रुवीकरण झाले. याच काळात हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण सुरू झाले. एकिकडे मराठा, ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलेला असतानाच भाजप नेते नितेश राणे यांनी मुस्लिम विरोधी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे आपोआपच हिंदू मतांचे ध्रुवीकरण व्हायला सुरूवात झाली. त्याचा फायदा भाजपलाच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या पाच वर्षात नितेश राणे यांनी भाजपमध्ये हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतिमा तयार केली. त्यांनी सातत्याने सभेमधून मुस्लिम विरोधी विधाने केली. हिंदुत्ववादी मोर्चा आणि सभांमध्ये नितेश राणे सातत्याने दिसले. त्यामुळे नितेश राणे यांची प्रतिमा आक्रमक हिंदुत्वादी नेता अशी झाली. हिंदू संघटनांनीही राणे यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे या पाच वर्षात दिसले.

दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने एकत्र राहून काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीला मतदान केलेलं आहे. ही बाब आता मतदानाच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेली आहे. त्यामुळे विधानसभेच्या जर निवडणुका ज्ािंकायच्या असतील तर मुस्लिम मतांवर अवलंबून राहता येणार नाही ही गोष्ट भाजपला कळून चुकलेली आहे. त्यामुळेच नितेश राणेंच्या माध्यमातून भाजपने आक्रमक हिंदुत्वाची नव्याने मांडणी केली. त्याचा या निवडणुकीत भाजपला किती फायदा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मालेगाव मध्य, छत्रपती संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, भिवंडी पश्चिम, धुळे, भिवंडी पूर्व, मुंब्रा-कळवा, मानखुर्द-शिवाजीनगर, चांदिवली, अणुशक्ती नगर, भायखळा पूर्व, भायखळा पश्चिम, मुंबादेवी, सोलापूर मध्य, मालाड पश्चिम, अकोला पश्चिम, अमरावती आदी मतदारसंघात मुस्लिम समाजाची ताकद आहे. या १७ मतदारसंघात भाजपला फारसा फायदा होणार नाही. मात्र, उर्वरीत जे २७१ मतदारसंघ आहेत, त्याची मोट भाजपला बांधायची होती. त्यामुळेच भाजपने नितेश राणे यांच्या माध्यमातून आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा रेटल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर दोन पातळ्यांवर काम करून मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न केल्याचे जाणकार सांगतात. एक म्हणजे विकासाच्या कामांना महायुती सरकारने हात घातला. लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणून सर्वच घटकातील महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित केलं. लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून विविध वर्गाना आपलेसे केले. उपेक्षित घटकांसाठी महामंडळं सुरू करून त्यांच्यातही आपले बस्तान बसवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासकामे करणारे मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा जपत होते, दुसरीकडे अजितदादा मुस्लिम आणि दलित मतांची बेगमी करताना दिसत होते तर भाजप नितेश राणेंच्या माध्यमातून आपला सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना दिसत होता. या पातळ्यांवर काम करत भाजपने विधानसभा निवडणुकीची मोट बांधली आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळाला हे निकाल लागल्यावरच समजेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR