27.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeउद्योगघाऊक महागाई दीड वर्षांतील सर्वोच्च पातळीवर

घाऊक महागाई दीड वर्षांतील सर्वोच्च पातळीवर

मे महिन्यात २.६१ टक्क्यांवर सलग ३ महिन्यांपासून वाढ

नवी दिल्ली : मे महिन्यात घाऊक महागाईचा दर २.६१ टक्क्यांवर पोहोचली असून हा गेल्या १५ महिन्यांतील उच्चांक आहे. उष्णतेच्या लाटेमुळे खाद्यपदार्थ, विशेषत: भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक उत्पादनांच्या किमती वाढल्याने महागाई वाढल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शनिवार दि. १५ जून रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई सलग तीन महिन्यांपासून वाढत आहे. मागील महिन्यात ती १.२६ टक्के होती, तर मे २०२३ मध्ये ती उणे ३.६१ टक्के होती. मे २०२४ मध्ये महागाई दरातील वाढ प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल, आदींच्या किंमतवाढीमुळे झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये घाऊक महागाईने ३.८५ टक्क्यांचा दर गाठत, उच्चांक नोंदवला होता. सरकारी आकडेवारीनुसार, मे महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई ९.८२ टक्क्यांवर पोहोचली असून हा दहा महिन्यांतील उच्चांक आहे.

पालेभाज्या महागल्या
मे महिन्यात भाज्यांची महागाई ३२.४२ टक्के होती, जी आधीच्या महिन्यात २३.६० टक्क्यांनी वाढली होती. कांद्याची भाववाढ ५८.०५ टक्के, तर बटाट्याची भाववाढ ६४.०५ टक्के होती. मे महिन्यात डाळींच्या महागाईत २१.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

धातूंच्या किमतीत वाढ
जागतिक धातूंच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन श्रेणीतील महागाई वाढण्यास हातभार लागला आहे. उत्पादनांमध्ये, मे महिन्यात महागाईचा दर ०.७८ टक्के होता, जो एप्रिलमधील उणे ०.४२ टक्क्यांपेक्षा जास्त होता. इंधन आणि उर्जा क्षेत्रातील महागाईचा दर १.३५ टक्क्यांवर आला आहे, एप्रिलमधील १.३८ टक्क्यांपेक्षा त्यात किरकोळ घट झाली आहे.

अन्नधान्य आणखी महागणार
देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम राहिल्याने, जूनमध्येही भाज्या आणि फळांच्या किमतीत वाढ होत आहे, त्यामुळे नजीकच्या काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सूनची प्रगती अन्नधान्य महागाईचा मार्ग निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असे बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ अदिती गुप्ता यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR