संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत एमआयएमला मत विभाजनाचा फायदा झाला. मुस्लीम आणि दलित मतांची मोट बांधत इम्तियाज जलील यांच्या सारख्या नवख्या पत्रकाराने या मतदारसंघात विजयश्री खेचून आणली. आता १० वर्षानंतर ही तशीच परिस्थिती तयार होत आहे. या राजकीय कुरूक्षेत्रात शिवसेनेच्या शिंदे सेनेने प्रदीप जैस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर उद्धव सेनेने किशनचंद तनवाणी यांचे नाव जाहीर केले. महाविकास आघाडीत प्रवेश मिळेल, या आशेवर एमआयएम होती. पण त्यांना कोणताही निरोप आला नाही. त्यानंतर एमआयएमने नासिर सिद्दिकी यांना पुन्हा या मतदारसंघातून उतरवले.
२०१९ मध्ये सिद्दिकी यांनी दुस-या क्रमांकावर धडक दिली होती. त्यामुळे दोन सेनेतील मत विभाजनाचा ‘एमआयएम’ला मोठा फायदा होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात एकूण ३ लाख ६६ हजार ४३५ मतदार आहेत. या मतदारसंघात हिंदू मतदान ४५ टक्क्यांच्या घरात आहे. तर मुस्लीम मतदार हे ३८ टक्के इतके आहेत. दलित समाजाचा मतांचा आकडा १५ टक्क्यांच्या घरात जातो. तर इतर ३ टक्क्यांच्या घरात मतदार आहेत. मागील निवडणुकीत अखंड शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना ४२ टक्के मतदान झाले होते. तर ‘एमआयएम’चे नासेर सिद्दीकी यांना ३५ टक्के मत मिळाली होती. वंचितचे उमेदवार अमित भुईगळ यांना १४ टक्के मतं मिळाली होती.
यावेळी भाजप-शिंदे सेना आणि ठाकरे सेना असे दोन उमेदवार मैदानात आहेत. तर ‘एमआयएम’च्या पाठीमागे दलित मते किती आहेत, हे निकालानंतर समोर येईल. वंचितने मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक यांच्या नावाची घोषणा केली. इतरही अनेक मुस्लीम उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे एमआयएमची मतं फुटण्याची पण चर्चा आहे. अर्थात विस्तृत चित्र पाहता सेनेच्या दोन्ही उमेदवारांना या मतदारसंघात नेटाने लढाई करावी लागणार हे स्पष्टच आहे.
जलील लढणार कोठून?
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज खरेदी केले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही ते नशीब आजमावणार आहेत. आता नासेर सिद्दिकी यांना मध्य मधून उमेदवारी दिल्याने जलील यांच्यासमोर औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर या दोन मतदारसंघाचा पर्याय उरला आहे.