24.6 C
Latur
Tuesday, September 24, 2024
Homeपरभणीनिम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने का भरला जात नाही?

निम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने का भरला जात नाही?

सेलू : सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प हा जालना व परभणी जिल्हा करता वरदान ठरत असून तो पूर्ण क्षमतेने का भरला जात नाही? त्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

जालना व परभणी जिल्ह्याकरता वरदान ठरू पाहणारा सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प हा तब्बल २८ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याकरिता २०१० साली जलसंपदा विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र तेव्हापासून आजपर्यंत निम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गरीब शेतक-यांना व सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचा पुरेपूर उपयोग घेता येत नाही. शासनाचेही मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान होत आहे. या सर्व गोष्टीकडे सर्व संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

मागील दोन वर्षापासून निम्न दुधना प्रकल्प केवळ ७५ टक्के भरला जात आहे. प्रकल्पाच्या असंपादित क्षेत्रात पाणी गेल्यामुळे ७५ टक्केच पाणीसाठा ठेवतात. मात्र संपादित जमिनीची देखील मोजणी झालेली असून लवकरच त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण होतील. त्यामुळे प्रकल्प हा १०० टक्के भरल्या जावा. या प्रकल्पाच्या कालवा वितरण व्यवस्थेची कामे देखील पूर्ण झालेली असून प्रकल्प १०० टक्के भरण्याकरिता योग्य आहे. मात्र तो पूर्ण क्षमतेने भरला जात नाही. प्रकल्प परिचलन आराखडा देखील पूर्ण झालेला आहे. ज्यामुळे शेतक-यांचे व शासनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यास जबाबदार कोण आहे? असाही प्रश्न निर्माण होतो.

वास्तविक पाहता १९८२ साली भूमिपूजन झालेल्या प्रकल्पाला पूर्णत्वाकडे येण्यास तब्बल २८ वर्ष लागली. २०१०ला निम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याकरिता तयार होऊन साठवणूक झालेल्या पाण्याचा वापर सर्वसामान्य व गरजू शेतक-यांना, नागरिकांना व्हावा याकरिता फार मोठ्या प्रमाणात अनेक स्थित्यंतरे झाली. केवळ २८ कोटी रुपयाची किंमत असलेला हा प्रकल्प एवढा रखडला गेला की कोट्यावधी रुपयाची वाढ होऊन अखेर २०१० ला पाणी साठवणुकीकरिता तयार झाला. त्यानंतर या प्रकल्पाचे रीतसर उद्घाटन देखील ठरले मात्र श्रेय वादामुळे आज पर्यंत झालेच नाही.

या प्रकल्पाची पूर्ण कामे झाल्यानंतर २०१५ साली प्रकल्पाचे विभागीय कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय देखील जालना येथे स्थलांतरित झाले. प्रकल्पाच्या देखभालिकरीता सेलू येथे उपविभागीय अभियंता कार्यालय असून दरवर्षी केवळ पावसाळा आला की या प्रकल्पाकडे पाहिले जाते. मात्र पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास तयार असलेल्या या प्रकल्पात प्रारंभा पासूनच प्रकल्पात केवळ ७५ टक्केच पाणीसाठा केला जात आहे.

निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयाची पाणी पातळी ४२५.२१० मिटर एवढी असून एकूण जलसाठा २८४.३८० दलघमी एवढा आहे. तर जिवंत पाणीसाठा १८१.७८० दलघमी एवढा आहे. तर प्रकल्पीय जिवंत पाणीसाठा क्षमता २४२.२०० दलघमी एवढी असून दि.२२ सप्टेंबर रोजी जिवंत पाणी साठा टक्केवारी ७५.०५ टक्के एवढी असून अद्याप २५ टक्के पाणीसाठा होणे शिल्लक आहे. तो करणे गरजेचे असताना देखील यावर्षी तीन वेळा प्रकल्पातून पाण्याचा फार मोठा विसर्ग करण्यात आलेला आहे. पानलोट क्षेत्रात व असंपादित केलेल्या जमिनीवर पाणी गेल्याचे कारण देत प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा केला जात नसल्याचे कळते. मात्र संबंधित जमिनीचे मोजमाप देखील करण्यात आलेले आहे. मग शंभर टक्के पाणीसाठा का केला जात नाही? त्याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न नागरिक आणि लाभार्थी शेतक-यांतून विचारल्या जात आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR