25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या वाढदिनी सुप्रिया सुळेंची स्पेशल पोस्ट

शरद पवारांच्या वाढदिनी सुप्रिया सुळेंची स्पेशल पोस्ट

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा संघर्षाचा काळ आहे. या संघर्षाच्या काळात आपण लढाल आणि जिंकाल याचा विश्वास असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आधी लढाई जनहिताची, म्हणत सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. शरद पवार यांना व्हीड्रओ कॉल करत सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचा स्क्रीनशॉट सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. तसेच शरद पवारांचे कुटंबासोबतचे फोटोही सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत.

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट
आधी लढाई जनहिताची!
प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंत:करणपूर्वक कृतज्ञ आहोत.

कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.
मला अनेकांनी विचारले, आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव (आबा) यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणे हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणे म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणे होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लडेंगे-जितेंगे!
बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR