बीड : आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मातृशक्तीला अभिवादन करण्याचा दिवस असल्याने सद्भावना पदयात्रा ही महिलादिनी सुरु करण्यात आली आहे. पण समतेचा व स्त्री पुरुष समानता हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही. महिलांना निव्वळ एक वस्तू मानणारी ही प्रवृत्ती आहे. आजपर्यंत संघप्रमुख हे पद एखाद्या महिलेला का देण्यात आलेले नाही?, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मस्साजोग येथून सकाळी सुरु झालेली सद्भावना पदयात्रा २३ किमीचा प्रवास करून नेकनूर येथे पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्यात आज याच विचाराच्या पिल्लावळींनी आका, खोक्या हा खेळ मांडला आहे, त्याविरोधी आपण रस्त्यावर उतरलो आहोत, आपण संविधानाचा विचार पुढे घेऊन जाऊ. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्त्रीभृणहत्या करण्यात येते हे चिंताजनक आहे. स्त्री पुरुष प्रमाणात बीड जिल्हा मागे आहे. आजच्या महिला दिनी स्त्री पुरुष समानतेचा संदेश घेऊन पुढे जावे लागणार आहे.
तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम केले, त्यांची गाथा काहींनी पाण्यात बुडवली. संत ज्ञानेश्वरांनी गीता सोप्या भाषेत लिहिली, त्यांना काहींनी त्रास दिला. बहुजन समाजाच्या प्रगतीत या विचाराने विरोध केला गेला. सावित्रिबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या. त्याला विरोध करत फुले दांम्पत्यांना शेणाचे गोळे व दगड मारणारा विचारही हाच होता, असे म्हणत त्यांनी संघावर टीकास्त्र डागले.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकडोजी महाराज यांचा विचार हा आयडिया ऑफ इंडिया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपाच्या राज्यात मोकाट आहेत, त्यांना सरकार संरक्षण देते, पुरस्कार देऊन गौरव करत आहे. समाजासमाजात भांडणे लावणे हा भाजपाचा विचार आहे. पण आपल्याला पुरोगामी विचाराने पुढे जावे लागणार आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी सद्भावना यात्रा काढण्यात आली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.