मुंबई : आगामी टी २० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. अंतिम सामना ८ मार्च रोजी, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादलाच का? मुंबईला ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना तिथे का अंतिम सामना खेळवला जात नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.
आगामी टी २० विश्वचषकाचा एक उपांत्य सामना हा मुंबईला तर दुसरा उपांत्य सामना हा कोलकाता किंवा श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. या आधी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आयसीसीला काही प्रश्न विचारले आहेत.
ते म्हणाले की, प्रत्येक अंतिम सामना हा अहमदाबादमध्ये खेळवला जात आहे. क्रिकेटची अशी कोणती पार्श्वभूमी त्या शहराला आहे? मुंबईत अंतिम सामना का खेळवण्यात आला नाही? आयसीसीने राजकारण किंवा पक्षपातीपणापासून दूर राहावे, अशी अपेक्षा आहे. ईडन गार्डन्स कोलकाता, एम.ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई, आय.एस. बिंद्रा मोहाली ही सर्व मैदाने टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी योग्य आहेत. पण यामध्ये राजकारण केलं जात असल्याने आपल्यावर अन्याय होतो अशी भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

