नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराला मिळालेल्या देणग्यांच्या हिशेबावरून काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक्स वरील पोस्टमधून या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे. तसेच, मंदिरातील देणग्यांच्या हिशेबाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
जयराम रमेश म्हणाले की देवाला अर्पण केलेल्या पैशांची चोरी करणे हे महापाप मानले जाते. मात्र, अयोध्येतील राम मंदिराच्या बाबतीत भाजप आणि संघाशी संबंधित लोकांच्या देखरेखीखाली असाच प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणातील मोठ्या दोषींना वाचवण्याचा आणि संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनीही हा प्रकार केवळ चोरी नसून दरोडा असल्याचे मान्य केल्याचा उल्लेख रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची व्यापक चौकशी का सुरू केलेली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी या प्रकरणावर पडदा टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राम मंदिराच्या देणग्यांचा हिशेब कुठे?
राम मंदिराच्या ट्रस्टवर भाजप, विश्व हिंदू परिषद आणि संघाशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: केली होती. या नियुक्त्या करताना सार्वजनिक चर्चा झाली नव्हती, असा आरोप रमेश यांनी केला आहे. आता या विश्वस्तांच्या देखरेखीखाली भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवणारा प्रकार घडल्याचा दावा करत त्यांनी मोदींना प्रश्न विचारले आहेत. राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय घेण्यात आघाडीवर असलेले पंतप्रधान या प्रकरणावर गप्प का आहेत? कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याऐवजी संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न का केला जात आहे? असे सवाल रमेश यांनी उपस्थित केले.
३,२६४ कोटी रुपये जमा झाल्याचा दावा
राम मंदिरासाठी २०२१ मध्ये राबवण्यात आलेल्या निधी समर्पण अभियानातून मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाल्याचा उल्लेख रमेश यांनी केला आहे. त्यांच्या पोस्टनुसार, संघ आणि मंदिर ट्रस्टच्या माहितीनुसार या अभियानातून निधी समर्पण आणि कॉर्पस देणगी मिळून एकूण ३,२६४ कोटी रुपये जमा झाले होते.
२०२४ मधील पहिल्या ९ महिन्यांत १३.५५ कोटी भाविक अयोध्येत आले. तसेच, २०२५ मध्ये महाकुंभमेळ्याच्या काळात सुमारे १० कोटी अतिरिक्त भाविक अयोध्येत आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. रमेश यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १६ कोटी भाविकांनी मंदिराला भेट दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या काळात जमा झालेला एकूण देणगी ८२.७८ कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आल्याने त्यांनी या हिशेबावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आकडेवारीनुसार प्रत्येक भाविकामागे सरासरी केवळ ५ रुपये देणगी येते. भाविकांची संख्या पाहता हा हिशेब संशयास्पद असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.
















