मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरले. ५ पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवले. त्यातच अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेविरोधात पोलिस अधिका-यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. ती आज निकाली काढली. यावेळी बनावट एन्काऊंटर प्रकरणातील पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला.
अक्षय शिंदेला बनावट एन्काऊंटरमध्ये मारले. कथित एन्काऊंटरचा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास व्हावा, अशी विनंती करीत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्यासह हेडकॉन्स्टेबल अभिजित मोरे व हरिश तावडे आणि एका पोलिस ड्रायव्हर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. या याचिकेवर रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी पार पडली. यााचिकाकर्ते पोलिस अधिका-यांना अर्ज करून अहवालाची प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिका-यांची याचिका हायकोर्टाने निकाली काढली.
समांतर चौकशी सुरू असल्याने अडचण
यावेळी बनावट एन्काऊंटरप्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाही, असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. या प्रकरणाची सीआयडीकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाची आयोगामार्फत समांतर चौकशीही सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेत, अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली.