25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात सर्वदूर मुसळधार

राज्यात सर्वदूर मुसळधार

मुंबई-ठाण्याला ऑरेंज तर रायगडला रेड अलर्ट

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत पावसाने मुसळधार हजेरी लावली. उत्तर-मध्य व उत्तर मुंबईत अनेक भागात ५० मिमीहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली. रविवारी मुंबईला यलो तर पालघर व ठाण्याला ऑरेंज आणि रायगडला मात्र हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला असून, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले आहे.

मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगडमध्ये शनिवारी सकाळपासून संततधार व अधूनमधून पावसाचा वाढलेला जोर दिसून आला. पावसाच्या आकड्यांनुसार, हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर सायंकाळी साडेपाचपर्यंत दिवसभरात ४६.९ व कुलाबा येथे १६.८ मिमी पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे ११०.७०, तर ठाण्यात ४८ मिमी पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे २९ मिमी पावसाची नोंद झाली. महामुंबईतील २५ हून अधिक पर्जन्यमापक केंद्रांवर शनिवारी १२ तासांत ४० ते ७० मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर व दक्षिण कोकणात गोव्यासह सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान ‘वाईडस्प्रेड’ म्हणजेच ७६ ते १०० टक्के भागात पावसाची शक्यता असेल. उत्तर कोकणात ताशी ६५ कि.मी. वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात नद्यांना पूर
मराठवाड्यात चार दिवसांपासून संततधार सुरू असून, विभागात गेल्या चोवीस तासांत ३४.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

पुण्यात दक्षतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्षतेचे आदेश दिले आहेत.

जळगावात दमदार पुनरागमन
जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा जोर पकडला. भडगाव तालुक्यात सर्वाधिक ३८.५, तर त्यापाठोपाठ एरंडोल ३६.१ तर अमळनेर तालुक्यात ३३.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पारोळा तालुक्याची तहान भागवणा-या तामसवाडी येथील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बोरी नदीला पूर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR