कानूपर : म्यानमार आणि थायलंड नंतर आता भारतातही म्यानमारसारखा भूकंप येण्याचा इशारा आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी मंगळवार दि. १ एप्रिल रोजी दिला आहे.
म्यानमारमध्ये शुक्रवार दि. २८ मार्च रोजी ७.७ आणि ६.४ रिश्टर स्केलचे दोन भयानक भूकंप झाले. या भूकंपांमुळे म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस झाला, ज्यात आतापर्यंत २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. ३०० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. म्यानमारमधील या भूकंपाचा धक्का शेजारील देश थायलंडलाही बसला आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणाले की म्यानमार आणि बँकॉकमध्ये झालेल्या भीषण भूकंपाचे मूळ कारण सागिंग फॉल्ट आहे. सागिंग फॉल्ट अतिशय धोकादायक असून नकाशाद्वारे हा फॉल्ट सहज पाहता येतो.
सिलीगुडीमध्ये आहे गंगा-बंगाल फॉल्ट
मलिक म्हणाले, भारताच्या पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये गंगा-बंगाल फॉल्ट आहे, तर म्यानमारमध्ये सागिंग फॉल्ट आहे. या दोन फॉल्टमध्ये इतर अनेक फॉल्ट लाइन्स आहेत. अशा परिस्थितीत, एक फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे दुसरा फॉल्टदेखील सक्रिय होऊ शकतो आणि यामुळेच भारतातदेखील भयंकर भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सागिंग जुना फॉल्ट
ते पुढे म्हणाले, सागिंग हा फार जुना फॉल्ट आहे. उत्तर-पूर्व शिअर झोन हा आराकान ते अंदमान आणि सुमात्रा पर्यंतच्या सबडक्शन झोनचा एक भाग आहे. अगदी सागिंग फॉल्टही जमिनीवरून दिसतो. जपानी आणि युरोपियन तज्ज्ञांनी सागिंगवर काम केले आहे. अनेक संशोधनातून असेही समोर आले आहे की, येथे दर १५० ते २०० वर्षांनी भूकंपाची वारंवारता असते. याचा अर्थ इतका मोठा भूकंप इतक्या वर्षांत एकदाच होतो.
भारताच्या झोन-५ वर विशेष लक्ष देण्याची गरज
मलिक पुढे म्हणतात, भारतात कोणत्याही मोठ्या भूकंपाची आपण वाट पाहू नये. हिमालयात अनेक सक्रिय फॉल्ट लाइन्स आहेत. अशा परिस्थितीत या क्षेत्रांमध्ये प्रचंड संशोधनाची गरज आहे. याशिवाय या भागात जास्तीत जास्त सावधगिरी बाळगून भूकंपाचा प्रभाव कमी करण्याचे काम करण्यात यावे.