27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवार गटाला अलिबाबा चाळीस चोर, असे नाव देणार का?

अजित पवार गटाला अलिबाबा चाळीस चोर, असे नाव देणार का?

जितेंद्र आव्हाड यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिल्यानंतर शरद पवार गटाकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड हे सुरुवातीपासून अजित पवार यांच्या विरोधात आक्रमकरीत्या बोलत आहेत. निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नाव शरद पवार गटाला देण्यात आल्यानंतर आव्हाड यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच आता अजित पवार गटाला अलिबाबा चाळीस चोर, असे नाव देणार का? अशी टीका केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार गटाकडून पाकिटमारासारखे शरद पवारांच्या मनगटावरचे घड्याळ चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. पण मनगट अजूनही शरद पवारांकडे आहे. ते मनगट चाळीशीत, साठीत जेवढे शक्तिशाली होते, तेवढेच आज ८४ व्या वर्षीही बळकट आहे. शरद पवार जेव्हा जेव्हा संघर्षाला उभे राहिले आहेत, तेव्हा त्यांनी इतिहास घडविला आहे. आताही पक्षाचे नाव, चिन्ह वेगळे असले तरी शरद पवार विजय खेचून आणतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

‘जितेंद्र आव्हाड पवारांच्या घरात आग लावत आहेत’, असे विधान काल एका नेत्याने केले. यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले, ‘‘मी आग लावण्याचे धंदे करत नाही. मी जर काही चुकीचं केलं असतं तर शरद पवारांनी माझा कान केव्हाच पकडला असता. उलट तुमच्या नादाला लागून पुतण्या (अजित पवार) खराब झाला. कारण तुमच्या रक्तातच ते होतं. जे माझ्या विरोधात बोलले, त्यांचे मी नावही घेणार नाही. तुम्ही तुमच्या बहिणीला, काकाला किती त्रास दिला. हा इतिहास महाराष्ट्रात कुणाला माहीत नसेल पण परळीतल्या गावागावांत माहीत आहे.’’ धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांवर घरात आग लावण्याबद्दल टीका केली होती. या टीकेला उत्तर देत असताना आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR