वॉशिंग्टन : शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने आता काश्मीर दहशतवादाला स्वत:शी जोडले आहे. अफझल गुरूच्या स्मरणार्थ १३ डिसेंबर रोजी भारतीय संसदेचा पाया आम्ही हादरवून सोडू, अशी धमकी त्याने दिली आहे.
पन्नूने जारी केलेल्या व्हीडीओमध्ये तो म्हणतो, मोदी सरकारने अमेरिकेत माझी हत्या करण्याचा कट रचला. आता आम्ही १३ डिसेंबरला त्याचा जो बदला घेऊ, त्याचा मुकाबला करण्याची भारताची तयारी आहे काय? १३ डिसेंबर २००१ रोजी अफझल गुरूने संसदेत हाहाकार घडवून आणला होता. आता १३ डिसेंबर २०२३ रोजी पन्नू त्याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल भारताचा सूड घेणार आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांनी माझ्यासोबत यावे, असे आवाहनही या व्हीडीओतून पन्नूने केले आहे. अमेरिका स्थित खलिस्तानी समर्थक दहशतवादी आणि शिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. त्याने एक व्हीडीओ जारी केला आहे. त्यात त्याने १३ डिसेंबर रोजी अथवा त्यापूर्वी संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. १३ डिसेंबर रोजीच्या दिवशी २००१ मध्ये संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या पन्नूने २०१३ मध्ये फाशी देण्यात आलेला संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फोटोसह एक पोस्टर असलेला व्हीडीओ जारी केला आहे, ज्यात दिल्ली बनेगा खलिस्तान असे कॅप्शन दिले आहे. पन्नूचा हा व्हीडीओ समोर आल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहे. भारतीय सुरक्षा एजन्सी आणि दिल्ली पोलिसांनी शिख फॉर जस्टिस समर्थकांचा असा कोणताही कट हाणून पाडण्यासाठी नवी दिल्ली जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.