लातूर : निवडणूक डेस्क
राज्यात विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लागला. आता उमेदवार निवडून आणण्याची मोठी कसरत या दोन्ही गटांना करावी लागणार आहे. २०१९ मध्ये भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्या. १०५ जागांवर भाजप विजयी झाली.
अर्थात २०१४ पेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या. पण राज्यात अखंड सेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून बिनसले आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. ‘ऑपरेशन लोटस’ने राज्याच्या राजकारणाची दिशा पालटवली. आता विधानसभा निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपाने स्मार्ट खेळी खेळली. ‘जागा तुमची, पण माणसं आमची’ असा हा फॉर्म्युला आहे. त्यांचे अनेक शिलेदार आता मित्रपक्षांच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या साखर पेरणीचा भाजपला किती फायदा होणार? ते पहावयाचे.
राजकारणात नवीन ट्रेंड
या निवडणुकीत भाजपने अजून एक नवीन ट्रेंड आणला. लोकसभेत हा प्रयोग ठळकपणे दिसला नाही. पण भाजपने महायुतीत मोठी खेळी खेळली. जागा वाटपातही भाजपने मोठी तडजोड केली असे नाही. २०१९ मध्ये अखंड शिवसेनेसोबत युती असताना भाजपने १६४ जागा लढवल्या होत्या. तर यावेळी जागांचा आकडा १४८ च्या घरात आहे. शिंदे सेनेला ८५ जागा तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला ५१ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे गेल्या विधानसभेच्या तुलनेत भाजपने १६ जागा कमी घेतल्या. पण त्याचवेळी भाजपचे शिलेदार मित्र पक्षांच्या गोटात पाठवले. म्हणजे भाजपची मंडळी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत उतरली आहेत.
भाजपच्या या स्मार्टखेळीमुळे काही मतदारसंघात भाजपला डॅमेज कंट्रोल करता आले आहे. भाजपच्या या स्मार्ट मूव्हमुळे विधानसभेत सर्वाधिक जागा मिळविण्याची महायुतीची खात्री वाढली आहे. भाजपला जे मतदारसंघ जागा वाटपात वाट्याला आले नाहीत. त्यामध्ये मित्र पक्षांच्या तिकिटावर भाजपचे नेते निवडणूक लढवणार आहेत. परिणामी या मतदारसंघातील इच्छुकांची नाराजी आपसूकच ओढवली जाणार आहे. या आयात उमेदवाराला निवडून देण्याचे शिवधनुष्य इतर पक्षातील कार्यकर्ते उचलतील का हा खरा प्रश्न आहे?