26.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रउद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार

उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार

नागपूर : उद्योग-व्यवसाय तुलनेने कमी असणा-या विदर्भ, मराठवाडा या भागात उद्योग-व्यवसाय सुरू करणा-या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबविला जाईल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सव अर्थात अ‍ॅडव्हांटेज विदर्भ या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून फडणवीस बोलत होते.

यावेळी फडणवीसांनी गुंतवणूकदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्योग-व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा वीजपुरवठा असून अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग-व्यवसाय उभारताना यामध्ये सवलत मिळण्याची मागणी योग्य आहे. त्यामुळे येणा-या काळात या संदर्भातील एक पॅटर्न आम्ही तयार करीत आहोत. याचा फायदा उद्योग समूहांना होईल. मात्र, मराठवाडा-विदर्भ यासारख्या मागास भागात उभारल्या जाणा-या उद्योगांनाच या पॅटर्नचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणताही उद्योग उभारण्यासाठी वीज, पाणी, मध्यवर्ती ठिकाण व अन्य पायाभूत सुविधांची गरज असते.

केंद्रीय रस्ते, महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भातील रस्त्यांचे जाळे मजबूत व दीर्घकाळासाठी उत्तम झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे एक वातावरणनिर्मिती झाली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी पुरवठा साखळी विदर्भात निर्माण झाली आहे. मोठे लॉजिस्टिक क्लस्टर आम्ही नागपूरमध्ये निर्माण करणार आहोत. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नागपूरला जगामध्ये पुढे आणायचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

नागपूर गुंतवणुकीचे हब बनणार : नितीन गडकरी
विदर्भाच्या विकासासाठी काय करता येईल, याच्या विचारमंथनासाठी अ‍ॅडव्हांटेज विदर्भ व खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीपासून वाशिमपर्यंत आणि बुलडाण्यापासून गडचिरोलीपर्यंत आम्ही चांगले रस्ते तयार केले. पाणी, वीज, पायाभूत सुविधा, विस्तीर्ण रस्ते, तंत्रज्ञान यासह केंद्रातून कोणतीही मदत लागल्यास मी तत्पर आहे. विदर्भात विकास झाला पाहिजे. गुंतवणूकदारांनी आरोग्य, अभियांत्रिकी, औषधी, पर्यटन, हॉटेल व्यवसाय व अन्य लॉजिस्टिकसारख्या मोठ्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे. तर, नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR