नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यापासून जागतिक अर्थव्यवस्थेची घडी बिघडत चालली आहे. आजच अमेरिकेने जशास तसे आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून चीन, कॅनडा या देशांनीही अमेरिकन वस्तू आणि सेवांवर कर लागू केला आहे. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होताना पाहायला मिळत आहे. बहुतेश देशातील शेअर बाजार कोसळले आहेत. टॅरिफ वॉरमध्ये आता सर्वसामान्य माणूस भरडला जाण्याची शक्यता आहे. कारण, येत्या काळात खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोया तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीत घट झाल्यामुळे भारताच्या खाद्यतेलाची आयात फेब्रुवारीमध्ये ४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. दुसरीकडे पाम तेलाची आयात जानेवारीमध्ये जवळपास १४ वर्षांच्या नीचांकावरून सुधारली आहे. सलग दुस-या महिन्यात नेहमीपेक्षा कमी आयातीमुळे जगातील सर्वात मोठ्या वनस्पती तेल खरेदीदाराच्या स्टॉकमध्ये घट झाली आहे.
परिणामी भारताला येत्या काही महिन्यांत खरेदी वाढवण्यास भाग पडेल. ज्यामुळे मलेशियन पाम तेलाच्या किमती आणि यूएस सोया तेलाच्या फ्युचरला सपोर्ट मिळेल. खाद्यतेल व्यापारी जीजीएन रिसर्चचे व्यवस्थापकीय भागीदार राजेश पटेल म्हणाले की, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये असामान्यपणे कमी आयात झाल्यानंतर मार्चपासून देशाची आयात वाढू शकते. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल खरेदी करतो, तर अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोया तेल आणि सूर्यफूल तेल आयात करतो.
पाम तेलाची आयात वाढली
पाम तेलाची आयात मागील महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ३६ टक्क्यांनी वाढून ३७४,००० मेट्रिक टन झाली आहे, जे जानेवारीमध्ये मार्च २०११ नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर घसरली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये संपलेल्या विपणन वर्षात भारताने दरमहा सरासरी ७५०,००० टन पाम तेल आयात केले. डीलर्स म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये सोया तेलाची आयात एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी घसरून २८४,००० मेट्रिक टन झाली आहे, जी ८ महिन्यांतील सर्वात कमी आहे, तर सूर्यफूल तेलाची आयात २२ टक्क्यांनी घटून २२६,००० मेट्रिक टन झाली आहे, जी ५ महिन्यांतील सर्वात कमी आहे.
तेलाच्या किमतीत वाढ
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू वर्षात वनस्पती तेलाच्या किमतीत ६ रुपयांनी वाढ झाली असून किंमत १७० रुपयांवरून १७६ रुपयांपर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, सोया तेलाच्या दरात ५ रुपयांनी वाढ होऊन भाव १५८ रुपयांवरून १६३ रुपयांवर आले आहेत. सूर्यफुलाच्या भावात ११ रुपयांनी वाढ झाली असून, भाव १७० रुपयांवरून १८१ रुपयांपर्यंत वाढले आहेत. सरतेशेवटी पामतेलाच्या दरात ३ रुपयांनी वाढ होऊन भाव १४३ रुपयांवरून १४६ रुपयांवर पोहोचले.