पुणे : पुणे प्रकरणातील आरोपीने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर प्रतिक्रिया देणे खूप घाईचे होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या गोष्टीची निश्चित माहिती हाती आली की, त्यावर बोलणे अधिक योग्य होईल. पुणे पोलिसांनी आरोपीला पकडले आहे आणि पुढील कारवाई देखील लगेचच सुरू झालेली आहे. पुणे प्रकरणात पोलीस पुढील तपास करतील. काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक स्तरावरील माहिती आमच्याकडे आलेली आहे. ही सगळी माहिती एकत्र केल्यावर जे समोर येईल, त्यानंतरच यावर बोलणे अधिक योग्य होईल.
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात तीन दिवसांनंतर अखेर पोलिसांना यश आले आहे. पुण्यात झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनीपुणे प्रकरणातील आरोपीला अटक केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आरोपीला अटक झालेली आहे. तो लपून बसला होता.
पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याला शोधून काढले आहे. ही संपूर्ण घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल. त्यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी काही माहिती दिली आहे. काही माहिती आता जाहीरपणे सांगणे योग्य नाही. योग्य स्तरावर तपास पोहोचला की, सगळी माहिती दिली जाईल. नेमका घटनाक्रम काय आहे, तो कसा घडला, याबाबत वेळ आल्यावर आपल्याला सगळी माहिती मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कदमांच्या विधानाला वेगळ्या पद्धतीने बघा
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, योगेश कदम जे बोलले, त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला हवे. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते की, हा गजबजलेला परिसर आहे, आजूबाजूला बरेच लोक होते, ती बस आतमध्ये कुठे उभी नव्हती, तर बाहेरच होती. पण, ही घटना घडतेय हे लोकांच्या लक्षात आले नाही, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा माझा समज आहे.
बोलताना जपून बोला
योगेश कदम नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईन की, अशा प्रकरणात बोलताना थोडे जपून, संवेदनशीलपणे बोलले पाहिजे. आपण बोलताना चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. कोणत्याही लोकप्रतिनिधीने या अशा घटनांवर बोलताना संवेदनशीलपणे बोलले पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.