उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उल्हासनगर घटनेबाबत संताप व्यक्त केला.
उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.
अजित पवार म्हणाले की, उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून, वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली, वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. कोणाहीबद्दल माझी काही तक्रार असेल, तर मी ती पोलिस स्टेशनला देईन. संबंधित घटनेबद्दलदेखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.