27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार

दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या सुरक्षेला आव्हान देणा-या प्रत्येक दहशतवादी संघटनेला उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान मोदींनी संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिला.

तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण होत असतानाच दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि कर्मचा-यांना संबोधित केले. भारतीय राज्यघटनेचे हे ७५ वे वर्ष संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे.

आज मी भारतीय राज्यघटनेला आणि संविधान सभेच्या सर्व सदस्यांना आदरपूर्वक अभिवादन करतो. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या सणाचे स्मरण करत असताना आज मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्तीही आपण विसरू शकत नाही. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. भारताच्या सुरक्षेला आव्हान देणा-या प्रत्येक दहशतवादी संघटनेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल या देशाच्या संकल्पाचाही मी पुनरुच्चार करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले.

२६ नोव्हेंबर २००८ साली पाकिस्तानातील १० लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशन आणि नरिमन हाऊससह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय भूमीवरील सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांना प्राण गमवावे लागले आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.

आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांना माहित होते की भारताच्या आकांक्षा, भारताची स्वप्ने काळाबरोबर नवीन उंची गाठतील. त्यांना माहित होते की स्वतंत्र भारताच्या आणि भारतातील नागरिकांच्या गरजा बदलतील, आव्हाने बदलतील. त्यामुळे त्यांनी आपली राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक न ठेवता त्याला एक जिवंत, अखंड वाहणारा प्रवाह बनवला. आपले संविधान हे आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे.

आज प्रत्येक देशवासीयाचे एकमेव उद्दिष्ट विकसित भारत घडवणे हे आहे. भारतीयांना जलद न्याय मिळावा यासाठी नवीन न्यायिक संहिता लागू करण्यात आली आहे. शिक्षा आधारित प्रणाली आता न्याय आधारित प्रणालीमध्ये बदलली आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

गेल्या १० वर्षांत पिढ्यानपिढ्या बेघर झालेल्या ४ कोटी भारतीयांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. गेल्या १० वर्षात १० कोटींहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहेत, ज्या घरोघरी गॅस पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत होत्या असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR