पाटना : होळीच्या निमित्ताने लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या विधानामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे. नितीश कुमार महाआघाडीत परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. लालू प्रसाद यादव यांचे विधान आणि राज्यातील वाढत्या हिंदुत्वाच्या वातावरणामुळे नितीश कुमार पुन्हा पलटी मारतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
त्यात होळीची संधी साधून लालू प्रसाद यादव यांनी जे विधान केले. त्यामुळे नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील भविष्याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. बिहारमध्ये भाजप आणि त्यांच्या सहका-यांकडून हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला जात आहे. त्यात नितीश कुमार यांनी याआधीही ब-याचदा त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये सध्या भलतीच चर्चा सुरू झाली आहे. राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी म्हटले की, प्रत्येक जुनी गोष्ट विसरून सोबत नवी सुरुवात करूया, प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने समाजाला पुढे नेऊ असे त्यांनी सांगितले.
लालू प्रसाद यादव यांचे हे विधान अप्रत्यक्षपणे राजकीय सूचक विधान आहे. विशेषत: लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार याआधी सामाजिक न्यायासाठी कधीकाळी एकत्र आले होते. लालू प्रसाद यादव यांच्या एका वाक्यानेच बिहारमधील राजकीय रंग दिसू लागले आहेत. लालू प्रसाद यांची थेट नितीश कुमार यांना महाआघाडी सोबत येण्याची ही ऑफर असल्याचं विश्लेषक सांगत आहेत.
नितीश कुमार पुरोगामी राजकारण करतात त्यात त्यांचा मित्रपक्ष भाजपा हिंदुत्वाचा अजेंडा आणखी मजबूत करत आहे. त्यामुळे या परिस्थितीत लालू प्रसाद यादव यांनी ही सूचक ऑफर दिली आहे. काही महिन्यांपूर्वी लालू यादव यांनी नितीश कुमारांसाठी दरवाजे बंद नाहीत. त्यांच्यासाठी राजदचे दरवाजे कायम खुले आहेत असे विधान केले होते.
विविध वक्तव्यांनी चर्चेला उधाण
बिहारमधील अधिवेशनात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार कधी पलटतील आणि इथे येतील याची काही गॅरंटी नाही असे विधान केले होते. २ जानेवारीला लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत असे म्हटले होते. पाटलीपुत्रचे खासदार मीसा भारती यांनीही राजकारणात सर्व काही शक्य आहे असे सांगितले. तर भाऊ वीरेंद्र यांनी स्पष्टपणे ते नितीश कुमार भाजपच्या दबावात आहेत. राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. राजकीय परिस्थितीचा खेळ आहे. बिहारमध्ये पुन्हा भूकंप होऊ शकतो असे विधान केले होते.