नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात उमेदवाराच्या निवडीपासून ते प्रचाराचाही समावेश आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेसने केलेल्या ठरावावरून ही चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी असा ठराव करण्यात आला आहे.
तेलंगणातील मेडक मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही याच जागेवरून निवडणूक लढवली होती. सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव आम्ही मंजूर केल्याचे काँग्रेस नेते मधु यक्षी गौर यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवल्यास त्याचा फायदा संपूर्ण दक्षिण भारतात काँग्रेस-इंडिया आघाडीला होईल, असेही त्यांनी म्हटले.