नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे सा-या महाराष्ट्रासोबतच देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी गुरूवारी दुपारी निकाल आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे.
तथापि, एकनाथ शिंदे यांनाच याप्रकरणी दिलासा मिळेल, असेच संकेत सध्या मिळत आहेत. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठविला आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेतल्याचे समजते.
दरम्यान एकनाथ शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेत नेतृत्व बदल केल्याचा दावा केला, आणि या मुद्द्यांचा आधारे शिंदे यांना अपात्रता प्रकरणी दिलासा मिळू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर…
अपात्रता प्रकणाचा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात लागला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागू शकते. मात्र यापूर्वीच शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार ठेवल्याची चर्चा आहे.