28.6 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात साखरेचे उत्पन्न घटणार ?

राज्यात साखरेचे उत्पन्न घटणार ?

वेळेआधीच उसाला फुटले तुरे वाढही खुंटली, ऊस उत्पादक संकटात

मुंबई : प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतक-यांसाठी सगळ्यात चिंतेची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचा उतारा कमी आहे. उसाची वाढ खुंटल्याने वेळेआधीच उसाला तुरे फुटले आहेत. परिणामी ऊसाच्या उता-यावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के साखरेचं उत्पन्न घटणार आहे.

दरम्यान, यावर्षी देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षी ३१९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र २७० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस गाळप हंगाम मार्च अखेरीस संपण्याची शक्यताही महासंघाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ऊस गाळप हंगाम लांबणीवर पडला होता. त्यामुळं शेतक-यांना फटका बसला आहे. आता मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील यंदाचा ऊस गाळप हंगाम ऊसाअभावी मार्चच्या शेवटी संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऊस टंचाईमुळं साखर कारखान्यांना अपेक्षित ऊस गाळप करणे मोठे आव्हान आहे. यासाठी उसाला जादा दर द्यावा लागणार आहे. हे सर्व झाले तरी ऊस टंचाईमुळे राज्यातील कारखान्यांचे हंगाम फेब्रुवारी महिन्यांचे शेवटच्या आठवड्यात बंद होण्यास सुरुवात होईल.

१९६ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू
राष्ट्रीय साखर कारखाने महासंघाच्या ताज्या अहवालानुसार गेल्यावर्षी जानेवारीमध्ये देशातील ५२४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते. यंदा मात्र देशातील ५०७ साखर कारखान्यांचे जानेवारीमध्ये गाळप सुरू आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी २०६ कारखाने सुरू होते. यंदा मात्र १९६ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे.

निर्यातीचा फटका शेतक-यांना
उत्तर प्रदेशमधील १२२ आणि कर्नाटकमधील ७७ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी अनुक्रमे १२० आणि ७४ कारखान्यांचं गाळप सुरू होते. केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधन घातलेली आहेत. त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यात बंदी हटवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यावरही नाईकनवरे यांनी साखरेच्या निर्यातीला आंशिक मान्यता देण्यात आल्याचा निर्णया योग्य वेळी घेण्यात आल्याचं सांगितलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR