नाशिक : प्रतिनिधी
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली असून आता रविवारी नागपुरात होणा-या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मागील महायुती सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्रात एकूण सात मंत्रीपद होती. यंदा मात्र राज्यात अनेक मंत्र्यांचा पत्ता कट होत असताना उत्तर महाराष्ट्रात इच्छुकांची भाऊ गर्दी असल्याने मंत्री पदाच्या संख्येत वाढ होणार असल्याची चिन्हे दिसत असून मागच्या सरकारमध्ये नाशिक जिल्ह्यात भाजपचा एकही मंत्री नव्हता.
दरम्यान, २०२२ साली एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी गुवाहाटी गाठल्याने महायुतीचा सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजप शिंदे शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आले आणि त्यानंतर अजित पवार अनेक आमदारांसोबत महायुतीत सामील झाल्याने राज्यात महायुतीचे भक्कम सरकार उभे राहिले.
यंदा मात्र नाशकात देखील भाजपचे मंत्री दिसणार असल्याची चर्चा आहे. उत्तरर महाराष्ट्रातील मंत्र्यांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार? नव्याने कोणाला संधी मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.मागील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजपचे ३, शिवसेना शिंदेगट २ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट २ असे एकूण ७ मंत्रिपद होते. त्यात नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रीपदं मिळाली होती. यामध्ये मालेगावचे शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि येवल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले होते.
नाशिक जिल्ह्यात भाजपचं एकही मंत्री नव्हता. यंदा मात्र नाशिक मध्यमधून तिस-यांदा निवडून आलेल्या भाजपच्या देवयानी फरांदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असून चांदवड विधानसभेचे भाजप आमदार राहुल आहेर यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार? हे आगामी काळात कळेल. तसेच दिंडोरीचे अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केली असून नांदगावचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना देखील मंत्रीपद मिळण्याची चर्चा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा विखे पाटलांसह भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे, राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगरचे आमदार संग्राम जगताप आणि कोपरगावचे आशुतोष काळे, अकोल्याचे किरण लहामटे आणि शिंदे सेनेकडून संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नेवासाचे विठ्ठल लंघे यांच्या नावाची चर्चा आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपचे गिरीश महाजन, शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील आणि अजित पवार गटाचे अनिल पाटील हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचे मंत्रीपद कायम राहणार असल्याची चर्चा आहे.
धुळ्यात यंदा शिंदखेडा विधानसभेचे आमदार जयकुमार रावल सलग पाचव्यांदा निवडून आल्याने मंत्रीपदासाठी यांच्या नावाची चर्चा असून शिंदे सेनेकडून मंजुळा गावित यांना देखील संधी दिली जाऊ शकते. नंदुरबार जिल्ह्यात मागच्या सरकारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित हे एकमेव मंत्री होते. आता मात्र शहादाचे भाजप आमदार राजेश पाडवी आणि अक्कलकुवा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमश्या पाडवी यांच्या नावाची चर्चा असून मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.