कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) स्पर्धेच्या १८ व्या हंगामातील सलामीची लढत गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित आहे. दोन्ही संघ शनिवारी, २२ मार्चला मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळण्यात येणार आहे. सलामीच्या लढतीआधी होणा-या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि लोकप्रिय गायिका श्रेया घोष रंग भरणार असल्याची माहितीही समोर आली आहे. हे सगळे ठरले असताना आता आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीचा सामनाच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयपीएल स्पर्धेतील शुभारंभाच्या सामन्याआधी होणा-या उद्घाटन सोहळ्याची जोरदार चर्चा रंगत असताना सामन्यावर संकटाचे ढग दाटून आल्याची बातमी समोर आली. भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सलामीच्या लढत रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार ते रविवार या कालावधीत दक्षिण बंगाल परिसरात वादळी वा-यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आयपीएल २०२५ च्या सलामीच्या लढतीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय रविवारी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार, शनिवारी म्हणजेच केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यातील सलामीच्या लढती दिवशी कोलकाता येथे ७४ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरात ९७ टक्के ढगाळ वातावरण आणि संध्याकाळच्या वेळी ९० टक्के पाऊस होईल. त्यामुळे सामना खेळवणं कठिण होऊ शकते.