कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असा प्रयत्न आहे. पण, ते प्रतिसाद देत नाहीत. ते सोबत आले तर ठीक, अन्यथा आघाडीचा उमेदवार दिला जाणार असून त्यादृष्टीने तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी झाली. यामध्ये या मतदारसंघाबाबत रणनीती ठरवण्यात आली. राजू शेट्टी यांनी महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे व त्यांना हातकणंगलेची जागा सोडण्यास आघाडीत एकमत झाले आहे. ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. शेट्टी यांना ताकद देण्याचा उद्धव ठाकरे यांचाच आग्रह आहे. पण, ते आघाडीसोबत येणार नसतील तर पाठिंबा का द्यायचा? असा प्रश्नही आघाडीत उपस्थित होत आहे.
मी कोणासोबतही जाणार नाही, येथे उमेदवार उभा करायचा की नाही? हे आघाडीनेच ठरवावे अशी भूमिका राजू शेट्टी यांनी स्पष्ट केल्यानंतर आघाडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
ही जागा शिवसेनेला सुटल्याने येथून माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजीत मिणचेकर यांनी लढावे, असा आग्रह होत आहे. आघाडीने उमेदवार दिल्यानंतर तिन्ही पक्षांनी ताकदीने मागे राहायचे असून, कोल्हापुरातील दोन्ही जागा मोठ्या फरकाने विजयी करायच्या आहेत, असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
आघाडीची ताकद असताना मागे का?
हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीचे तीन आमदार, चार माजी आमदार आहेत. इतकी ताकद असताना आघाडी गप्प का? ताकदीने निवडणुकीला सामोरे गेलो तर यश निश्चित असल्याचे या वेळी पदाधिका-यांनी सांगितले.