छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून राज्यातील महिलांना १५०० रुपये दरमहा मिळणार असून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. अशात या योजनेवरून विरोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. याच योजनेवरून आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी फुकटचे पैसे वाटणार का, असे म्हणत सरकारवरच निशाणा साधला आहे.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस अर्ज करणा-यांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार असून या मुद्यावरून जलील यांनी सरकारवर टीका केली आहे.
‘लाडक्या बहिणीला तुम्ही फुकटचे दीड हजार रुपये देणार आहात, ते का देताय? तुम्हाला राज्यातील महिला काही लाडक्या नाहीत तर तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी असणा-या महिलांना देत आहात. लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारे १५०० रुपये तुम्ही तुमच्या खिशात ठेवा आणि दोन महिन्यांनी होणा-या निवडणुकीमध्ये आम्हाला जास्तीत जास्त मते द्या.. अशी राज्य सरकारची योजना आहे.’ असे म्हणत इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे.