नाशिक : प्रतिनिधी
नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होत आहे. नाशिकच्या जागेवरून बरीच रस्सीखेच झाली. त्यानंतर ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे गेली. त्यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा संधी दिली. उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने गोडसे यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. त्यातच आता सकल मराठा समाजाने महायुतीला मोठा धक्का दिला आणि नाशिक, दिंडोरीत सकल मराठा समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.
नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरेसेनेच्या राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला. मराठा आरक्षणासाठी उपोषण, आंदोलन करणा-या मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा देण्याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण नाशिक मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.