22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रबाबर यांच्या जाण्याने शिवसेना परिवारात मोठी पोकळी

बाबर यांच्या जाण्याने शिवसेना परिवारात मोठी पोकळी

मुख्यमंत्री शिंदेंकडून शोक शासकीय इतमामात अन्त्यसंस्काराच्या सूचना

मुंबई : आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण ख-या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खो-यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले.

खानापूर आटपाडी भागामध्ये शेतक-यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांनीही अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खानापूर-आटपाटीला जाणार आहेत.

संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील बाबर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR